गणेशोत्सव साजरा करण्यासाठी लागणारा वीजपुरवठा वेगवेगळ्या मार्गाने घेतला जात असून, प्रामुख्याने घरगुती वापरातील वीज अनेक सार्वजनिक मंडळांकडून वापरली जाते. तसेच काही ठिकाणी वीजखांबातून अनधिकृतपणे वीज घेऊन वीजचोरी केली जाते. हा प्रकार थांबवण्यासाठी महावितरणने गणेशोत्सव मंडळांना घरगुती दरापेक्षाही कमी दरात वीजपुरवठा करण्यास सुरुवात केली आहे. सध्या घरगुती वापरासाठी ३ रुपये ७६ पैसे प्रति युनिट वीज आकारली जाते, तर गणेश मंडळांना ३ रुपये ७१ पैसे प्रति युनिट वीज देण्यात येणार आहे. या कमी वीजदरामुळे गणेशोत्सव मंडळांमध्ये जागृती होऊन अधिकृतपणे वीज घेणाऱ्यांची संख्या दरवर्षी वाढू लागली आहे. २०११ मध्ये २५५ मंडळांनी अधिकृत वीजजोडणी घेतली होती, तर २०१४ मध्ये ही संख्या ४८८ पर्यंत पोहोचली आहे. यंदाही अधिकृत मार्गाने वीजजोडणी घेण्याचे आवाहन महामंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.गणेशोत्सवाच्या काळात सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांची नयनरम्य आरास हा नागरिकांच्या कुतूहलाचा विषय असून अशी आरास पाहण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी गणेशोत्सव मंडळांमध्ये उसळत असते. ही सजावट करताना मोठय़ा प्रमाणात विजेचा वापर करण्यात येत असला तरी अनेक ठिकाणी विजेची स्वतंत्र जोडणी घेतली जात नाही. घरगुती किंवा अनधिकृत मार्गाने वीज घेतली जाते. अनधिकृत वीजजोडणीमुळे मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता निर्माण होते. त्यामुळे हे प्रकार टाळण्यासाठी महावितरणने स्वस्त विजेचे पर्याय गणेश मंडळांसमोर उपलब्ध करून ठेवला आहे. घरगुती किंवा व्यापारी वीजजोडणीचे दर हे दरवर्षी वाढत असले तरी त्या दरापेक्षा कमी दरात गणेशोत्सव मंडळांना वीजपुरवठा करण्याचा निर्णय महावितरणच्या वतीने घेण्यात आला आहे. हंगामी स्वरूपाची अधिकृत वीजजोडणी गणेशोत्सव मंडळांना देऊन उत्सवाच्या काळात होणारे गैरप्रकार रोखण्याच्या उद्देशातून महावितरणकडून हा उपक्रम राबविण्यात येतो. यंदाही हा उपक्रम गणेशोत्सव मंडळांसाठी सुरू करण्यात आला असून ७ वॉटपर्यंतचा वीजपुरवठा शाखा कार्यालयात संपर्क करून मिळू शकतो, तर त्यापेक्षा जास्त वीजपुरवठय़ासाठी महावितरणच्या विभागीय कार्यालयात अर्ज करण्याचे आवाहन भांडुप नागरी परिमंडळाचे मुख्य अभियंता सतीश करपे यांनी केले.
वीजचोरीवर कारवाई
वीजचोरी रोखण्यासाठी महावितरणचा महिला अधिकाऱ्यांचा दामिनी पथक कार्यरत असून उत्सवाच्या नावाने वीजचोरी करणाऱ्यांवर तात्काळ कारवाई करण्यासाठी हे पथक सज्ज असते. गेल्या वर्षी १० उत्सवांवर दंडात्मक कारवाई करत त्यांना अधिकृत वीजजोडणी देण्याचे काम या पथकाने केले. या माध्यमातून वीजचोरीवर आळा बसला आहे. त्यामुळे अधिकृतपणे वीजजोडणी घेऊन उत्सव साजरा करण्याचे आवाहन महावितरणच्या वतीने करण्यात आले आहे.

Story img Loader