कल्याण पूर्व, पश्चिम भागात रस्ते खोदाईचे कामे मोठय़ा प्रमाणात सुरू असल्याने शहरात सकाळपासून धुळीचे लोट पसरलेले असतात. या धुळीमुळे रहिवासी विविध व्याधींनी त्रस्त आहेत. आजूबाजूची दुकाने, व्यापाऱ्यांना या धुळीचा सर्वाधिक त्रास होत आहे. या रस्ते कामांमुळे आमचा धंदा बसला असल्याच्या प्रतिक्रिया व्यावसायिकांकडून देण्यात येत आहेत.
कल्याणमध्ये मुरबाड रस्ता सिमेंट काँक्रीटचा करण्याचे काम सुरू आहे. सकाळपासून या भागात रस्ते काम सुरू असल्याने या रस्त्याच्या एका बाजूने ये-जा करणाऱ्या प्रवाशांना धुळीचा त्रास सहन करावा लागतो. कामाच्या ठिकाणी मिक्सरच्या माध्यमातून रस्ते कामाचे मिश्रण तयार केले जाते. त्यात बाजुला खोदाई सुरूअसते. अनेक ठिकाणी रस्ते तयार झाले आहेत. परंतु, पुरसे पाणी या रस्त्यावर मारले जात नसल्याने ये-जा करणाऱ्या वाहनांमुळे हा धुरळा हवेत उडत आहे.
कल्याण पूर्व भागात महानगर गॅसतर्फे वाहिन्या टाकण्याची कामे सुरू आहेत. सकाळपासून ही कामे सुरू होतात. वाहिन्या जमिनीखाली टाकण्यात येत असल्याने रस्ते, गल्लीबोळ ठेकेदाराकडून खणण्यात येत आहेत. काम होणे आवश्यक असल्याने कोणी या विषयावर बोलत नाही. मात्र, सततच्या धुरळ्यामुळे रहिवासी हैराण आहेत. रस्ते खोदाकाम झाल्यानंतर पाठीमागचा मातीचा ढिगारा तसाच ठेवण्यात येत आहे. हा ढिगारा किंवा खोदलेला रस्ता सुस्थितीत कोणी करायचा हे एकदा गॅस कंपनी आणि पालिकेने जाहिर करावे, अशी रहिवाशांची मागणी आहे.