ठाणे : येथील सर्वाधिक गर्दीचे ठिकाण असलेल्या माजिवाडा आणि विटावा चौकात बसविण्यात आलेली धुळ प्रदूषण नियंत्रण यंत्रणा अखेर पालिका प्रशासनाने कार्यान्वित केली आहे. हा प्रकल्प मार्च महिनाअखेरपर्यंत पूर्ण करण्याची मुदत होती. परंतु ती मुदत उलटूनही हा प्रकल्प कार्यान्वित झाला नव्हता. या संदर्भात लोकसत्ताने दिलेल्या वृत्तानंतर जाग आलेल्या महापालिका प्रशासनाने हि यंत्रणा सुरू केली आहे.
ठाणे शहरातून जाणारे महामार्ग, प्रमुख रस्ते आणि अंतर्गत मार्गांवर वाहनांची सतत वर्दळ असते. या वाहतुकीमुळे ध्वनी आणि धुळ प्रदूषणात वाढ होत आहे. त्यावर नियंत्रण आणण्यासाठी पालिकेकडून विविध उपाययोजना करण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून शहरातील ४० चौकांमध्ये ४० हून अधिक धुळ नियंत्रण यंत्रे पालिकेने बसविली होती. या यंत्रामध्ये विशिष्ट पद्धतीने पंख्यांची रचना करण्यात आली होती.
हेही वाचा – २७ गावांमधील नागरी समस्यांवरून संघर्ष समितीचे कडोंमपासमोर धरणे आंदोलन
०.५ अश्वशक्ती (एचपी) क्षमतेच्या मोटारद्वारे आणि या यंत्रातील फिल्टरद्वारे वातावरणातील मानवी आरोग्यास हानीकारक असलेले हवेतील २५ ते ५० मायक्रॉन आकारमानाचे धूलिकण शोषून त्यानंतर शुद्ध हवा बाहेर सोडायची, अशी ही यंत्रणा होती. खासगी लोकसहभाग (पीपीपी) तत्वावर उभारण्यात आलेली ही यंत्रणा दोन वर्षांपूर्वी बंद पडली. त्यानंतर पालिकेने हा प्रकल्पच गुंडाळून त्याजागी नवा प्रकल्प राबविण्याचा निर्णय घेतला. रस्त्यांवर पाण्याचा फवारा करून त्याद्वारे धुळ प्रदूषण रोखायचे असा हा प्रकल्प आहे. त्यासाठी माजिवाडा आणि विटावा चौकात यंत्रेही बसविण्यात आली आहेत. परंतु मार्च महिन्याची मुदत संपुष्टात येऊनही हा प्रकल्प अद्याप कार्यान्वित होऊ शकलेला नव्हता. या संदर्भात लोकसत्ताने वृत्त दिले होते. त्यानंतर जाग आलेल्या पालिका प्रशासनाने यंत्रणा सुरू करण्यासाठी पाऊले उचलली होती. अखेर ही यंत्रणा कार्यान्वित झाली आहे.