ठाणे : एकीकडे हवेचा स्तर खालावत असल्यामुळे मुंबई महापालिकेकडून कठोर पावले उचलली जात असतानाच, दुसरीकडे मुंबईला लागूनच असलेल्या ठाणे शहरात धुळ नियंत्रणासाठी बसविण्यात आलेली यंत्रे बंदावस्थेत असल्याचे चित्र दिसून येत आहे. रस्ते खोदकामुळे यंत्राला होणारा विद्युत पुरवठा बंद झाला असून यामुळे ही यंत्रे बंदावस्थेत असल्याचा दावा पालिकेने आहे.
ठाणे शहरातून जाणारे महामार्ग, प्रमुख रस्ते आणि अंतर्गत मार्गांवर वाहनांची सतत वर्दळ असते. या वाहतुकीमुळे ध्वनी आणि धुळीकणांचे प्रमाण वाढले आहे. गेल्याकाही दिवसांपासून मुंबई शहरात प्रदुषणामुळे हवेचा स्तर मोठ्याप्रमाणात खालावत असल्याचे चित्र आहे. काही दिवसांपूर्वीच मुंबई महापालिकेने नागरिकांना मुखपट्टी वापरण्याच्या सूचना केल्या होत्या. तसेच बांधकामाच्या ठिकाणी पाण्याची फवारणी करणारी यंत्रणा आणि धुळ शोषक यंत्रे कार्यान्वित करण्याचा इशारा विकासकांना दिला आहे. ठाणे शहरातही अनेक ठिकाणी इमारतींची बांधकामे सुरू आहेत. शहरात मोठ्याप्रमाणात धुळ दिसून येत आहे. असे असतानाच सात महिन्यांपूर्वी केंद्र शासनाच्या राष्ट्रीय स्वच्छ हवा कृती आराखड्याअंतर्गत मिळालेल्या निधीतून ठाणे महापालिकेने शहरात बसविलेली धुळ नियंत्रण यंत्रे बंदावस्थेत आहेत. धुळीचे प्रदूषण कमी करण्यासाठी यंत्रामार्फत पाणी फवारणी करण्यात येते. शहरातील माजिवडा आणि विटावा या सर्वाधिक वर्दळीच्या चौकात प्रत्येकी दोन यंत्र बसविण्यात आली आहेत. पावसाळ्यापूर्वी ही यंत्रे सुरू होती. पावसाळ्यात ही यंत्रे बंद ठेवण्यात आली होती. आता पाऊस संपून महिना उलटला तरी ही यंत्रे बंदावस्थेत आहेत.
काही वर्षांपूर्वी महापालिकेने प्रदूषण नियंत्रणासाठी शहरातील ४० चौकांमध्ये ४० हून अधिक धुळ नियंत्रण यंत्रे बसविली होती. या यंत्रामध्ये विशिष्ट पद्धतीने पंख्यांची रचना करण्यात आली होती. ०.५ अश्वशक्ती (एचपी) क्षमतेच्या मोटार आणि प्रक्रियेद्वारे वातावरणातील मानवी आरोग्यास हानीकारक असलेले हवेतील २५ ते ५० मायक्रॉन आकारमानाचे धूलिकण शोषून त्यानंतर शुद्ध हवा बाहेर सोडायची, अशी ही यंत्रणा होती. ही यंत्रणा दोन वर्षांपूर्वी बंद पडल्यानंतर पालिकेने हा प्रकल्प गुंडाळून नवीन यंत्रणा बसविली. परंतु ही यंत्रेही बंदावस्थेत असल्याने पालिकेच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
हेही वाचा – भाजपा प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांचा दोन दिवस भिवंडी, कल्याण लोकसभेचा दौरा
विटावा येथील यंत्रणा सुरळीत असून माजिवडा चौकातील यंत्रणा लवकरच कार्यान्वित करण्यात येणार आहे. काही तांत्रिक कारणांमुळे ही यंत्रणा बंदावस्थेत आहेत. – मनीषा प्रधान, प्रमुख, प्रदूषण नियंत्रण विभाग, ठाणे महापालिका.