वाहनांची संख्या १७ लाखांवर; धुलिकणांचे प्रमाण वाढले
ठाणे शहरातील वाढत्या नागरीकरणाचा विपरित परिणाम पर्यावरणावर होऊ लागला आहे. ठाणे, कळवा आणि मुंब्रा या तीन शहरांमध्ये गेल्या दोन वर्षांत दुचाकींच्या संख्येत १२ टक्क्य़ांनी वाढ झाली आहे. या वाहनांमुळे तसेच बांधकामांमुळे शहरातील हवेचे प्रदुषण कमालिचे वाढले असून धूळ आणि धुरात ठाणेकर अक्षरश गुरफटू लागल्याचे निरीक्षण ठाणे महापालिकेच्या यावर्षीच्या प्रदुषण अहवालातही नोंदविण्यात आले आहे. गावदेवी मैदान, बाळकुम फायर ब्रिगेड, कॅस्टलमील नाका, कोपरी स्टेशन, कळवा प्रभाग समिती कार्यालय आणि विलवड नाका या भागातील हवा अतिप्रदुषीत असल्याचा निष्कर्षही या अहवालात काढण्यात आला आहे.
मुंबई, पुणे तसेच नाशिक या जिल्ह्य़ांकडे जाणारे मार्ग ठाणे शहरातून जातात. तसेच गुजरात राज्याकडे (पान ६वर)
जाणारा महामार्गही ठाणे शहरातूनच जातो. त्यामुळे या मार्गावर वाहनांची सतत वर्दळ सुरू असते. याशिवाय, शहरातील अंतर्गत भागातही वाहनांचा मोठा राबता असतो. शहरातील या वाहनांचा आकडा १७ लाख ३७ हजार ९८८ इतका असून त्यामध्ये दुचाकी, कार, रिक्षा, जीप, ट्रक आणि बस या वाहनांचा समावेश आहे. या वाढत्या वाहनांमुळे तसेच बांधकामांमुळे शहरातील हवा प्रदुषणात वाढ झाली आहे. गेल्या दहा वर्षांत धुलीकण दुप्पटीने वाढले आहे. गेल्यावर्षी त्यामध्ये काही प्रमाणात घट झालेली आहे, असा दावा अहवालात करण्यात आला आहे.
दरम्यान, ठाणे महापालिकेच्या प्रदुषण नियंत्रण विभागाने शहरातील विविध भागातील चौकांमध्ये कार्बन मोनोक्साइड व बन्झिनचे निरीक्षण केले. यामध्ये कॅडबरी जंक्शन व्यतिरिक्त जवळजवळ सर्वच चौकांमध्ये कार्बन मोनोक्साईडचे तसेच बेन्झिनचे प्रमाण मर्यादित असल्याचे दिसून आले आहे. असे असले तरी, गेल्या दहा वर्षांत धुलीकणांमध्ये दुप्पटीने वाढ झाल्याने नागरिकांसाठी ही धोक्याची घंटा आहे.
महापालिकेने केलेल्या हवेतील प्रदूषकांच्या नितीन कंपनी जंक्शन, शास्त्रीनगर, मुलूंड चेकनाका या तीन चौकातील हवा प्रदुषित तर बाळकुम अग्निशमन केंद्र, वाघबीळ नाका, गावदेवी मैदान, कॅसलमील नाका, कोपरी स्थानक, कळवा प्रभाग कार्यालय, विलवड नाका या भागातील चौकांमधील हवा अतिशय प्रदुषित आणि वागळे अग्निशमन केंद्र भागातील हवा मध्यम प्रदूषित असल्याचे म्हटले आहे.