लोकसत्ता खास प्रतिनिधी
डोंबिवली: डोंबिवली पूर्वेतील सागर्ली भागातील डोंबिवली जिमखान्याजवळील राज्य परिवहन महामंडळाचे आगार ते बालाजी मंदिर रस्त्याची दुरवस्था झाली आहे. रस्त्यावरील डांबराचा थर निघून गेल्याने खडी, माती रस्त्यावर पसरली आहे. या रस्त्यावर वाहनांची सतत वर्दळ असल्याने प्रवाशांबरोबर परिसरातील रहिवासी उडणाऱ्या धुळीने हैराण आहेत.
डोंबिवली जिमखान्याकडून मानपाडा रस्ता भागात, एमआयडीसीमध्ये जाण्यासाठी अनेक नागरिक, व्यावसायिक, उद्योजक या रस्त्याचा नियमित वापर करतात. खराब रस्त्यामुळे नागरिकांना पर्यायी रस्त्याचा अवलंब करावा लागत आहे. या भागात शाळा, मंदिरे आहेत. पालक, विद्यार्थ्यांची या रस्त्यावर सतत वर्दळ असते. अनेक भाविक सकाळ, संध्याकाळ या भागातील बालाजी मंदिरात दर्शनासाठी येतात.
आणखी वाचा-ठाणे: मेट्रो १२ मार्गिकेच्या उभारणीला गती
शिवसेनेचे मातब्बर या भागात राहतात. अनेक दुचाकी स्वार या रस्त्यावरील खडीवर घसरून पडत आहेत. दररोज अशाप्रकारच्या चार ते पाच घटना घडत आहेत, असे स्थानिकांनी सांगितले. या रस्त्यावर उडणाऱ्या सततच्या धुळीमुळे अनेक नागरिक सर्दी, खोकल्याने आजारी असल्याच्या तक्रारी आहेत.
एकीकडे शहरातील रस्ते सुस्थितीत केला जात असल्याचा दावा काही राजकीय मंडळी करत आहेत. मग अशा वर्दळीच्या रस्त्यांची दुरुस्ती का तत्परतेने केली जात नाही, असे संतप्त प्रश्न प्रवासी करत आहेत. या भागात अनेक बंगले आहेत. रस्त्यावर वाहनांनी उडणारी धूळ घरात येत असल्याने खिडकी, दरवाजे ठेऊन बसावे लागते, असे बंगले मालकांनी सांगितले.