किशोर कोकणे
तुटके पंखे, प्लास्टिक कचरा यामुळे हवा शुद्धीकरण प्रक्रिया ठप्प
शहरातील प्रदूषण कमी करण्यासाठी मोठा गाजावाजा करत भागीदारी (पीपीपी) तत्त्वावर बसविण्यात आलेले धूळ प्रदूषण नियंत्रण यंत्रणा बंद असल्याचे चित्र शहरात आहे. यंत्रांमध्ये बसविलेले पंखे तुटलेल्या अवस्थेत आहेत, तर काही यंत्रांमध्ये प्लास्टिक कचरा साठलेला आहे. त्यामुळे ही यंत्रे निरुपयोगी ठरत असतानाच त्यावर चिकटवण्यात आलेल्या जाहिराती मात्र लक्ष वेधून घेत आहेत.
ठाण्यातील महत्त्वाच्या चौकांमध्ये बांधकामांमुळे निर्माण होणारी धूळ आणि वाहनांतून बाहेर पडणारे प्रदूषण नियंत्रण करण्यासाठी ठाणे महापालिकेने सुमारे दोन वर्षांपासून शहरातील ४० चौकांमध्ये ४० हून अधिक यंत्रे बसविली. यात नितीन कंपनी, तीन हात नाका चौक, कॅडबरी जंक्शन, ठाणे रेल्वे स्थानक परिसर या महत्त्वाच्या यंत्रांचा समावेश होता. मात्र, गेल्या काही महिन्यांपासून या महत्त्वाच्या चौकांमधील यंत्रांची अवस्था अत्यंत वाईट झाली असून धूलिकण शोषणारी यंत्रे आता धूळ खात बसली आहेत. प्रत्येक चौकातील अध्र्याहून जास्त यंत्रे बंद आहेत, तर यंत्रे बंद असल्याने आता ही यंत्रे केवळ जाहिरातीचा खांब असल्याची अवस्था झाली आहे.
ठाण्यातील तीन हात नाका या चौकात प्रत्येकी १० फुटांवर एकूण सहा यंत्रे बसविली आहेत. यातील ५ यंत्रे बंद आहेत, तर नितीन कंपनी चौकामध्ये बसविलेले एक यंत्रही बंद आहे. विशेष म्हणजे, नितीन कंपनीपासून ठाणे महापालिकेचे मुख्यालय अगदी हाकेच्या अंतरावर आहे, तर ठाणे रेल्वे स्थानक परिसरातही सहा यंत्रे बसविली होती. यातील तीन यंत्रे बंद होती. मात्र उशिराने जाग आलेल्या महापालिकेने ही यंत्रे गुरुवारी दुरुस्त केली. महापालिकेच्या विद्युत विभागाकडून विजेचा पुरवठा व्यवस्थित होत नसल्याने ही यंत्रे बंद पडल्याची माहिती सूत्रांनी दिली.
काही दिवसांपूर्वी महापालिकेने शहरात अशी २०० यंत्रे बसविणार असल्याचे सांगितले होते. ठाणे रेल्वे स्थानकासारख्या गजबजलेल्या चौकांतील यंत्रांचे देखभाल करणे जर ठाणे महापालिकेला शक्य होत नसेल तर संपूर्ण शहरात जर ही यंत्रे बसविण्यात आली तर, त्याची देखभाल दुरुस्ती करणे शक्य होईल का, असा प्रश्न यानिमित्ताने विचारला जात आहे. दरम्यान, यासंदर्भात पालिकेचे उपायुक्त संदीप माळवी यांच्याशी संपर्क साधला असता, बंद यंत्रे लवकरच दुरुस्त केली जातील, असे त्यांनी सांगितले.
यंत्रणा काय?
हे यंत्र पाच फूट उंच आणि अडीच फूट रुंदीचे आहे. या यंत्रामध्ये विशिष्ट पद्धतीने पंख्यांची रचना करण्यात आली आहे. ०.५ अश्वशक्ती (एचपी) क्षमतेच्या मोटारद्वारे वातावरणातील २ हजार सीएफएम इतकी हवा यात शोषली जाते. मानवी आरोग्यास हानीकारक असलेले हवेतील २५ ते ५० मायक्रॉन आकारमानाचे धूलिकण या यंत्रातील फिल्टरद्वारे शोषले जातात आणि त्यानंतर शुद्ध हवा बाहेर सोडली जाते.