कल्याण : शुक्रवारी संध्याकाळी चार वाजण्याच्या दरम्यान कल्याण डोंबिवली परिसरात धुळीचे वादळ आल्याने नागरिकांची तारांबळ उडाली. सोसाट्याच्या वाऱ्याबरोबर वाहून आलेली धूळ आणि वाऱ्याने अर्धा तासात दाणादाण उडवली. वादळामुळे परिसर धुळीने भरून गेला होता. आता पाऊस सुरू होईल या प्रतीक्षेत असताना अर्धा तासानंतर वादळ शमले. नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला.

वादळानंतर गारा पडतील, पाऊस सुरू होईल या आनंदाने शाळकरी मुले मात्र ओरडा करत रस्त्यावर उतरली होती. इमारतींवरील पत्र्यांवरील धूळ, उंच भागात हवेने उडून जाणाऱ्या वस्तू कागदाच्या तुकड्यासारख्या या वादळात उडून गेल्या. डोंबिवली एमआयडीसी मिलापनगर भागात अनेक ठिकाणी झाडे कोसळली. एके ठिकाणी टाटा नेक्सन वाहनावर गुलमोहराचे झाड कोसळून गाडीचे नुकसान झाले.

रस्त्यावरून वाहने चालविणाऱ्या वाहन चालकांना समोरून धुळीचे लोट, वेगवान वारा येत असल्याने वाहने चालविताना कसरत करावी लागली. अपघात टाळण्यासाठी अनेक वाहन चालकांनी झाडापासून दूर अंतरावर वाहने रस्त्याच्या कडेला वाहने उभी करून काही वेळ थांबणे पसंत केले. शुक्रवारी संध्याकाळी कल्याण डोंबिवली परिसर वादळामुळे धूळमय होऊन गेला होता. बाजारपेठा, नागरिकांनी उभारलेले प्लास्टिक कापडाचे निवारे या वादळात उडून गेले. अनेक निवाऱ्यांची पडझड झाली. कल्याण, डोंबिवलीतील बाजारपेठांंमध्ये अधिक प्रमाणात पडझड झाली.

दुपारी तीन वाजण्याच्या दरम्यान शहापूर, कसारा, खर्डी भागात वादळी वाऱ्यासह पावसाला सुरूवात झाली. त्यानंतर हे वादळ अर्धा तासाने कल्याण, डोंबिवलीकडे धडकले. शहापूर, डोळखांब भागात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस कोसळला. ठाणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागांमध्ये शेतकऱ्यांची राब भाजणीची कामे सुरू आहेत. पावसाळ्यापूर्वीची शेतीची कामे सुरू आहेत. भिवंडी, कल्याण परिसरातील वीटभट्टी मालकांनी मात्र या वादळीच्या वाऱ्याच्या भीतीने आपल्या वीटभट्ट्यांवर प्लास्टिक टाकून वीटभट्ट्या पाऊस या भीतीने झाकून घेतल्या. वीटभट्टयांवर अद्याप विटा तयार करण्याची कामे सुरू आहेत. या विटांच्या भट्ट्या लावून त्यांची भाजणीची कामे पूर्ण करायची आहेत. तत्पूर्वीच पावसाचे इशारे येऊ लागल्याने वीटभट्टी मालकांमध्ये अस्वस्थतेचे वातावरण आहे. पाऊस पडून तयार विटांचे नुकसान झाले तर ते नुकसान भरून निघणारे नसते, असे वीटभट्टी मालकांनी सांगितले. काही भागात पावसाळी भात पिकांची लागवड केली जाते. या शेतकऱ्यांनी पावसाच्या भीतीने भात काढणीचा हंगाम सुरू केला आहे.