Kalyan-Dombivali Rain: उन्हाच्या कडाक्याने अवघा महाराष्ट्र होरपळत असताना काही भागात अवकाळी पाऊस बरसला आहे. अवकाळीमुळे शेतीवर संकट ओढवले असून शहरी भागातही धुरकट वातावरण निर्माण झाल्याचे दिसत आहे. शुक्रवारी (४ एप्रिल) कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर, बदलापूर आणि आसपासच्या परिसरात धुळीचे मोठे लोळ दिसून आले. वातावरण धुरकट झाल्यानंतर काही ठिकाणी तुरळक अवकाळी पावसाच्या सरी कोसळल्या. कडक उन्हाळ्यात पावसाच्या सरी बरसल्यामुळे या भागातील नागरिक सोशल मीडियावर त्याचे व्हिडीओ, फोटो शेअर करत आश्चर्य व्यक्त करत आहेत.
भारतीय हवामान विभागाने (IMD) शुक्रवारी दुपारीच अवकाळी पावसाबाबत इशारा दिला होता. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळे आणि हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसासह ताशी ३०-४० किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे, असा इशारा हवामान विभागाने दिला होता.
दि. ५ एप्रिल ते ८ एप्रिलच्या दरम्यान हवामानात बदल अपेक्षित असल्याचेही हवामान विभागाने म्हटले आहे. काही ठिकाणी उष्ण आणि दमट हवामान जाणवू शकते, असेही सांगितले गेले होते. नागरिकांनी उष्णतेपासून बचाव करण्यासाठी आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले होते.
कल्याणमध्ये धुळीचे लोळ आणि पाऊस
कल्याण शहर आणि ग्रामीणमध्ये दुपारी चार वाजण्याच्या सुमारास धुळीसह जोरदार वारे वाहू लागले. कल्याण आणि आसपासच्या सुमारास सकाळपासून ढगाळ वातावरण होते. त्यात दुपारनंतर काही ठिकाणी तुरळक पावसाच्या सरी कोसळल्या.
दरम्यान सोशल मीडियावर अनेकांनी धुळीचे वादळ आणि अवकाळी पावसाचे व्हिडीओ शेअर केले आहेत.
बिइंग कल्याणकर आणि व्ही कल्याणकर या इन्स्टाग्राम हँडलवर कल्याण-डोंबिवली परिसरातील वादळ आणि अवकाळी पावसासंबंधीचे व्हिडीओ शेअर करण्यात आले आहेत.