वाढत्या नागरीकरणामुळे बदलापूर शहराची लोकसंख्या मोठय़ा प्रमाणात वाढली. एके काळचे हे टुमदार गाववजा शहर आता महानगराच्या दिशेने वाटचाल करीत आहे. शहरातील धावपळीच्या जीवनशैलीत समोरच्या फ्लॅटमध्ये राहणारा कोण हे वर्षांनुवर्षे कळत नाही. अशा परिस्थितीत एक २४ घरांचे कुटुंब बदलापुरातील पूर्व विभागात सुखाने नांदते आहे. या सोसायटीचे नाव ‘दत्त गुरुकुल’. शून्य कचरा मोहीम, पर्जन्य जलसंधारण आदी उपक्रम राबवून या वसाहतीने शहरातील इतर संकुलांपुढे चांगला आदर्श ठेवला आहे.
दत्त गुरुकुल गृहनिर्माण संस्था, बदलापूर (पूर्व)
बदलापूर पूर्वेकडे गावदेवी मंदिराजवळील शिव मंदिरासमोरच्या रस्त्याला अनेक जुन्या वसाहती आहेत. त्यातीलच एक म्हणजे दत्त गुरुकुल सहकारी गृहसंस्था. रामचंद्र मालुसरेच्या जागेत १९९९ मध्ये ही बहुमजली इमारत उभी राहिली. दुर्दैवाने इमारतीचे बांधकाम सुरू असतानाच विकासक संजय जोशी यांचे निधन झाले. त्यामुळे कायदेशीर बाबी पूर्ण करण्याची सर्व जबाबदारी इमारतीच्या सदस्यांवर येऊन पडली. त्यात इमारतीची अनेक छोटीमोठी कामेही त्यांनाच करावी लागली. मात्र एकीच्या बळावर संस्थेने उशिराने का होईना सर्व बाबींची पूर्तता केली.
इमारतीच्या निर्मितीनंतर तब्बल १० वर्षांनी सोसायटी स्थापन झाली. सोसायटीचे वैशिष्टय़ म्हणजे त्याचा कारभार महिलांच्या हाती आहे. मनीषा जडे या सध्या अध्यक्षपदाचा कारभार पाहत आहेत, तर रहिवासी संस्थेच्या खजिन्याच्या चाव्याही राणी कुलकर्णी यांच्याकडे आहे. त्यामुळे एक प्रकारे संपूर्ण रहिवासी संस्थेचा कारभार महिलांच्या हाती आहे. महिलांच्या हाती कारभार असल्याने सोसायटीच्या खर्चात मोठय़ा प्रमाणावर बचत होते, कारण महिला फक्त व्यवहार न पाहता भावनिकदृष्टय़ा प्रत्येक बाबीचा विचार करतात. त्यामुळे सोसायटीचाच फायदा होत असतो, असे वसंत कुलकर्णी सांगतात.
पर्यावरणस्नेही गणेशोत्सव</strong>
तळमजला आणि दोन मजल्यांच्या या इमारतीत २४ फ्लॅट्स आहेत. वैशिष्टय़पूर्ण रचनेमुळे इमारतीतील रहिवाशांचा एकमेकांशी मोठय़ा प्रमाणावर संपर्क येत असतो. सध्या येथे मराठी भाषिकांची संख्या अधिक आहे. सोसायटीत एखादा कार्यक्रम आयोजित करून मग सर्वाना एकत्र येण्याची संधी मिळेल, असे प्रसंग येतच नाहीत, कारण सोसायटीत सुरू असलेल्या कामाच्या आणि प्रकल्पांच्या निमित्ताने सर्वाची रोज एकदा तरी भेट होतेच, असे दीपक अहिरे सांगतात. आठवडय़ातून एकदा स्वच्छता मोहिमेमुळे सर्व रहिवासी एकत्र येतात. सोसायटीच्या वतीने वर्षांतून एकदा सत्यनारायणाची पूजा आयोजित केली जाते. सोसायटीत सार्वजनिक गणेशोत्सव साजरा केला जात नाही, मात्र इमारतीतील चार घरी गणपती येतात. तोच आपला उत्सव मानून सर्व सोसायटी सार्वजनिकरीत्या गणेशोत्सव साजरा करतात. विशेष म्हणजे पर्यावरणाचे भान राखून सोसायटीच्या आवारातच शाडूच्या मातीपासून मूर्ती तयार केल्या जातात. त्यानंतर एका बादलीत त्या मूर्तीचे विसर्जन केले जाते. तसेच कोजागिरी, होळी आणि ज्येष्ठांचे वाढदिवस उत्साहात साजरे केले जातात.
रेन वॉटर हार्वेस्टिंगसोबतच दत्त गुरुकुल रहिवाशी संस्थेने शून्य कचरा मोहीमही यशस्वीपणे पार पाडली आहे. कुळगाव बदलापूर नगरपालिका आणि रोटरी क्लबच्या डॉ. शकुंतला चुरी यांच्या साहाय्याने सुरू झालेल्या शून्य कचरा मोहिमेला रहिवाशांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. ओला कचरा आणि सुका कचरा वेगळा करून ओला कचरा एका बंदिस्त डब्यात प्रक्रियेसाठी टाकला जातो. त्यातून ओल्या कचऱ्याचे विघटन होऊन खतनिर्मिती होते. तेच खत इमारतीच्या आवारातील झाडांसाठी वापरले जाते. दररोज नियमितपणे सर्व फ्लॅटधारक ओला कचरा वेगळा करून या मोठय़ा आकाराच्या चौकोनी डब्यात टाकत असतात.
त्यामुळे फक्त सुका कचरा आता बाहेर दिला जातो. ओल्या कचऱ्याप्रमाणे सुक्या कचऱ्याच्या विघटनासाठीही पर्याय शोधले जात आहेत, अशी माहिती जयदेव शेलार यांनी दिली.
जिव्हाळ्याचे नाते
संकुलाच्या सर्व उपक्रमांत रहिवासी उत्साहाने सहभागी होत असतात. सोसायटीतील ज्येष्ठ तानाजी अहिरे सध्या पक्षाघातामुळे बिछान्याला खिळले आहेत. मात्र त्याआधी सोसायटीच्या विकासात त्यांचा मोठा हातभार असल्याचे सर्व रहिवासी सांगतात. विविध उपक्रम राबवण्यात सोसायटीचे माजी अध्यक्ष विनोद जडेही तितकेच सक्रिय असतात. रेन वॉटर हार्वेस्टिंग असो वा कचरा विघटनाचा प्रकल्प, जडे कुटुंब सोसायटीलाच आपले घर मानून काम करताना दिसतात. त्यांनी सोसायटीच्या सुरक्षेसाठी स्वखर्चाने सीसीटीव्ही कॅमेरे लावले आहेत. इमारतींमध्ये पार्किंगच्या जागेवरून अनेकदा वाद होताना दिसतात. मात्र येथे आपली वाहने इमारतीबाहेर लावून मुलांना खेळण्यासाठी जागा मिळावी, असा रहिवाशांचा प्रयत्न असतो. इमारतीत एकटय़ा राहणाऱ्या ७५ वर्षीय शैलजा सोनावळे आपल्या मुलींकडे राहण्यापेक्षा सोसायटीत राहणे पसंत करतात. वयोवृद्धांच्या सुरक्षेचा प्रश्न त्यांना येथे जाणवतही नाही, असे ते सांगतात. यावरून सोसायटीतील सदस्यांमधील असलेले नाते स्पष्ट होते.
जल व्यवस्थापन
राज्यात प्रचंड दुष्काळ असून यंदा शहरांनाही त्याची मोठय़ा प्रमाणावर झळ बसते आहे. राज्यातील जवळपास सर्वच शहरांमध्ये पाणीकपात सुरू असून पाण्यावरून दोन जिल्ह्य़ांमधील वादही आपल्याला नवीन नाहीत. मात्र चार वर्षांपूर्वी रोटरी क्लबच्या पुढाकाराने सुरू झालेली रेन वॉटर हार्वेस्टिंगची मोहीम या गृहसंकुलाने यशस्वी करून दाखवली आहे. त्यामुळे ऐन मे महिन्यातही दत्त गुरुकुल सोसायटीला पाण्याची कोणतीही कमतरता नाही. चार वर्षांपूर्वी आम्ही पाण्यावरून होणारी भांडणे पाहिली आहेत. मात्र रेन वॉटर हार्वेस्टिंगमुळे आमच्यातील पाण्यावरील तंटे कमी झालेच, शिवाय आमच्या या प्रकल्पामुळे शेजारच्या इमारतींतील कूपनलिकांच्या पाणी पातळीतही वाढ झाली आहे, असे प्रतीक जडे सांगतात. पाणीप्रश्न सुटण्यासोबतच पाणी करापोटी भरावी लागणारी रक्कमही प्रतिमहिना दीड ते दोन हजारांनी कमी झाली आहे. पाण्याचा गैरवापर टाळण्यासोबतच पाणी जिरवण्यावर रहिवाशांचा भर असतो. त्यासाठी इमारतीच्या संरक्षक भिंतीलाही जाळी लावून झाडे लावण्याची योजना राबवण्यात येत आहे. पाण्याच्या टाकीचीही व्यवस्था अशा प्रकारे करण्यात आली आहे, की ती चुकून पूर्ण भरून वाहिल्यास इमारतीतील झाडांना ते पाणी मिळेल. त्यानंतरही दुर्लक्ष झाल्यास पाणी थेट कूपनलिकेच्या खड्डय़ात जाऊन मिळते. त्यामुळे पाणी वाहून जाऊन त्याचा अपव्यव होण्याचा प्रश्न मिटला आहे.
छोटेखानी बाग
मुबलक पाण्यामुळे इमारतीत जवळपास १०० छोटय़ामोठय़ा रोपांची एक बाग फुलवण्यात आली आहे. फुलांच्या झाडांसोबतच मिरची, ओवा, नारळ अशी झाडेही या बागेत लावण्यात आली आहेत. इमारतीचा मागचा भाग, संरक्षक भिंत, नाला इ. भागांतही जमेल त्या भागात झाडे लावण्यात आली आहेत. तसेच कुंडय़ांच्या साहाय्यानेही अनेक झाडे जगवण्यात आली आहेत. त्यामुळे सोसायटीत प्रसन्न वातावरण अनुभवण्यास मिळते. सार्वजनिक झाडांसोबतच प्रत्येक फ्लॅटधारकाने आपल्या वेगळ्या कुंडय़ांतून झाडे लावली आहेत.