ठाणे – ई-ऑफीस प्रणालीतील तांत्रिक उणिवा दूर करण्यासह अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना दिलेले प्रशिक्षणाच्या जोरावर अखेर ठाणे जिल्हा परिषदेने ई-ऑफीस प्रणाली कार्यान्वित करण्यात आली असून आतापर्यंत ५ हजार २०० नस्ती तयार करण्यात आले आहेत. आता, नविन येणारे प्रस्ताव किंवा निर्णयाची अंमलबजावणी ई-प्रणाली द्वारे होत आहे. यामुळे कामकाजाला गती मिळण्यासह जिल्हा परिषदेत नस्ती आणि कागदांचा वापर कमी झाला असल्याची प्रतिक्रिया जिल्हा परिषदेमार्फत देण्यात आली.
प्रशासकीय कामकाज सुरळीत आणि वेगवान व्हावे यासाठी ठाणे जिल्हा परिषदेने ई- ऑफीस सुविधा सुरु करण्याचा निर्णय २०२३ मध्ये घेतला होता. त्यानुसार, प्रत्यक्ष अंमलबजावणी करण्यावर देखील जिल्हा परिषदेने भर दिला होता. परंतू, ई -ऑफीस प्रणालीत कागदपत्रे अपलोड करताना येत असलेल्या तांत्रिक अडचणीमुळे कर्मचाऱ्यांना प्रत्यक्ष नस्ती घेऊन ते पूर्ण करावे लागत होते. त्यात, कर्मचाऱ्यांमध्ये असलेला तांत्रिक ज्ञानाचा अभाव यामुळे देखील एक नस्ती अपलोड करण्यास अधिकचा वेळ लागत होता.
परंतू, जिल्हा परिषदेचा कारभाराला गती मिळावी आणि हे काम सुरळित व्हावे याकरिता मुख्य कार्य़कारी अधिकारी रोहन घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व विभागांच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना ई – ऑफीस प्रणालीचे प्रशिक्षण देण्यात आले. त्यासह, संबंधित विभागाला तांत्रिक अडचणी सोडविण्यास सांगण्यात आले. त्यामुळे अखेर गेल्या महिन्याभरा पासून जिल्हा परिषदेत ई- ऑफीस प्रणालीद्वारे कामकाज सुरु करण्यात आले आहे.
यामध्ये विविध विभागांचे प्रस्ताव तयार करण्यापासू तो प्रस्ताव विविध विभागात पाठवून त्यावर संबंधित अधिकाऱ्यांची स्वाक्षरी घेण्याचे काम करण्यात येत असून आता जिल्हा परिषदेचे सर्व कामकाज ई-प्रणालीवर पूर्णपणे सुरु आहे. ग्रामपंचायत स्तरावर देखील ई-प्रणालीचा वापर व्हावा यासाठी पाच पंचायत समितीमधील कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले होते.
नस्तीचा आणि कागदांचा वापर थांबला
ठाणे जिल्हा परिषदेचे कामकाज करताना कागदांचा सर्वाधिक वापर होत असे. एखाद्या कामाची नस्ती तयार करण्यापासून ते कर्मचाऱ्यांच्या बदलीचे आदेश काढेपर्यंत अशा सर्वच कामांसाठी नस्ती तयार केल्या जात होत्या. प्रस्ताव तयार करणे आणि त्यावर स्वाक्षरी घेण्यासाठी त्या नस्ती विविध विभागात पाठविण्यात येतात. यामुळे शासकीय कार्यालयात कागदपत्रांचे ढिग दिसायचे. ई-ऑफीस प्रणालीमुळे जिल्हा परिषदेत आता, नस्ती आणि कागदांचा वापर थांबल्याचे चित्र आहे.
१०० दिवसांचा कृती कार्यक्रमांतर्गत जिल्हा परिषद ठाणे ई ऑफिस प्रणालीत सर्व नस्तीचे कामकाज करण्यात येत आहे. सर्व पंचायत समिती अंतर्गत ही पेपरलेस कार्यवाही करण्यात यावी, यासाठी तालुका स्तरावर सर्व अधिकारी आणि कर्मचारी यांना ई -ऑफिस कार्यप्रणाली वापरण्यासाठी विशेष प्रशिक्षण जिल्हा परिषदेमार्फत देण्यात आले आहे. – अविनाश फडतरे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी सामान्य प्रशासन विभाग, ठाणे जिल्हा परिषद