डोंबिवली : कल्याण-शिळफाटा रस्त्यावरील पलावा उड्डाण पूल लवकर पूर्ण करा. लोकांचे हाल होत आहेत. एमआयडीसीतील काँक्रिटीकरणाचे रस्ते खड्डे, प्रवासी हाल, उद्योजकांची होणारी परवड थांबविण्यासाठी लवकर पूर्ण करा म्हणून मागील काही महिन्यांपासून पाठीमागे लागूनही पूर्ण ताकदीने शासकीय यंत्रणा, ठेकेदार काम करत नसल्याने मनसेचे कल्याण ग्रामीणचे आ. प्रमोद उर्फ राजू पाटील यांनी यजमानांकडे ११ दिवसांचा मुक्काम करुन विसर्जनासाठी निघालेल्या गणरायाला ही रखडलेली, संथगतीने सुरू असलेली कामे लवकर पूर्ण करण्याची बुध्दी देण्याची मागणी केली आहे.
ही सुरु असलेली विकास कामे कल्याण ग्रामीण मतदारसंघात येतात. ही कामे मंजूर करुन आणताना शिवसेनेचे कल्याण लोकसभेचे खा. डाॅ. श्रीकांत शिंदे यांनी ही कामे आपल्या प्रयत्नाने मंजूर झाली. ही कामे झटपट पूर्ण होणार म्हणून शिळफाटा रस्त्यावरील पलावा, एमआयडीसी भागात फलकबाजी केली होती. या फलकबाजीवरुन मनसे, शिवसेनेमध्ये यापूर्वी कवित्व रंगले होते.कल्याण-शिळफाटा रस्त्यावरील पलावा चौकातील उड्डाण पुलाचे काम दोन वर्षापासून सुरू आहे. हे काम गती न घेता अतिशय संथगतीने सुरू आहे. या चौकातील उड्डाण पुलाचे काम पूर्ण झाले तर शिळफाटा रस्त्यावरील कोंडीचा मोठा अडसर दूर होणार आहे. हा पूल मार्गी लागावा, या पुलाच्या मार्गातील अडथळे दूर करुन या पुलाची विनाविलंब उभारणी करावी यासाठी पुलासाठी निधी आणणारे, पुलाचे काम झटपट होणार म्हणून फलकबाजी करणारे प्रयत्न करत नसल्याने आ. पमोद पाटील यांचा या मंडळींवर रोष आहे.
हेही वाचा : ठाणे : कळव्यातील वाहून गेलेल्या मुलाचा मृतदेह आढळला
या पुलाला खेटून हाॅटेल, इतर दुकाने आहेत. या दुकानांना नवी मुंबईतील बड्या राजकीय मंडळींचा आशीर्वाद असल्याने या दुकानांना हात न लावता कसरत करुन पलावा चौकात पूल उभारणीची कामे ठेकेदाराला करावी लागत आहेत.पलावा चौक हा शिळफाटा रस्त्यावरील मोठा अडथळा आहे हे माहिती असुनही या पुलाचे काम गतीने करण्यात येत नसल्याने स्थानिक आ. पाटील यांनी या पुलाच्या आधार खांबावर (पीलर) पुल लवकर उभारणीची बुध्दी यंत्रणांना देण्याची प्रार्थना करणारा फलक लावला आहे.डोंबिवली एमआयडीसीत सात महिन्यापूर्वी तत्कालीन पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते ११० कोटी खर्चाच्या रस्ते काँक्रीटीकरणाच्या कामाचे भूमिपूजन करण्यात आले.
हेही वाचा : ठाणे : गणेशोत्वाच्या मंडपावर झाड कोसळले ; एकाचा मृत्यू तर चार जण जखमी
तत्कालीन नगरविकास मंत्री तथा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यावेळी कार्यक्रमाला उपस्थित होते. एमआयडीसीतील खराब रस्त्यांवरुन आ. पाटील यांनी एमआयडीसीला लक्ष्य केले होते. येथील रस्ते कामांसाठी माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या आदेशावरुन कल्याण डोंबिवली पालिका आणि एमआयडीसीने निवासी, औद्योगिक क्षेत्रातील रस्ते करण्याचे आदेश दिले होते.या रस्ते कामासाठी निधी मंजूर करण्यासाठी आ. पाटील यांच्याप्रमाणे खा. शिंदे यांनीही जोरदार प्रयत्न केले होते. हा निधी मंजूर होताच खासदारांनी आम्ही केवळ पत्रव्यवहार करुन नाही तर कृतीतून दाखवून देतो, असे म्हणून आ. पाटील यांनी डिवचले होते. त्यानंतर पाटील, शिंदे यांच्यात काही महिने एकमेकांना डिवचणारे फलकयुध्द सुरू होते. ही कामे झटपट पूर्ण होतील खा. शिंदे यांची तशी कामाची पध्दत आहे, असे मुख्यमंत्री शिंदे यांनी आ.पाटील यांना व्यासपीठावरुन सांगितले होते.
हेही वाचा : महामार्गावर वाहने लुटणाऱ्या ११ जणांच्या आंतराज्य टोळीला भिवंडी पोलिसांकडून अटक
एमआयडीसीतील रस्ते कामे सुरू होऊन सात महिने उलटले तरी फक्त २०० मीटरचा एक टप्पा पूर्ण झाला आहे. एका राजकीय ठेकेदाराला हे काम देण्यात आल्याने एमआयडीसीला या ठेकेदाराला काम वेगाने करण्यासाठी दबाव टाकता येत नसल्याचे कळते. राजकीय आशीर्वादामुळे ठेकेदार संथगतीने ही कामे करत आहेत. त्याचा त्रास प्रवाशांना खड्डे, पाणी तुंबणे सारख्या प्रकारातून होत आहे. हे माहिती असुनही ही कामे वेळेत पूर्ण करण्यात येत नाहीत. त्यामुळे संतप्त झालेल्या आ. प्रमोद पाटील यांनी खोचक टिकेचे फलक पलावा चौक, एमआयडीसीत लावले आहेत. आता या फलकांना शिवसेनेकडून काय प्रतिसाद दिला जातो याकडे सगळ्यांच्या नजरा लागल्या आहेत.