शहापूर तालुक्यातील वेहळोली व परिसरातील गाव पाड्यात दिवसरात्र जाणवणारे भूकंपाचे सौम्य धक्के आणि मोठ्याने होणारे आवाज यामुळे येथील नागरिकांमध्ये भयाचे वातावरण पसरले आहे. मागील आठ दिवसांपासून तडे गेलेल्या घरातील नागरिक रात्रीच्या वेळी कडाक्याच्या थंडीमध्येही तंबूत राहत आहेत. तसेच खबरदारीचा उपाय म्हणून येथील नागरिकांनी घरात न झोपता अंगणात झोपावे असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
हेही वाचा- टिटवाळा रेल्वे स्थानकात लोकलच्या डब्यात महिलेची प्रसूती
शहापूर तालुक्यातील वेहळोली व परिसरातील गाव पाडे भूकंपाचे सौम्य धक्क्यांनी हादरले आहे. २.०७ रिश्टर स्केल इतक्या धक्क्याची नोंद झाली असून तालुक्यातील सोगाव केंद्रबिंदू असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. भूकंपाचे धक्के बसणारे गाव पाड्यांत महसूल विभागाचे उपविभागीय अधिकारी बाळासाहेब वाकचौरे आणि त्यांच्या पथकाने पाहणी केली. वेहळोलीसह हरणेपाडा, सासेपाडा, कातकरीवाडी, कानडी, खरीवली, शिवाजीनगर (किन्हवली) यासह भूकंपाचे धक्के बसणाऱ्या परिसरातील गावपड्यांमधील ग्रामस्थांशी प्रत्यक्ष संवाद साधला. भूकंप होणार नाही अशी सकारात्मक भावना ठेऊन सावध राहण्याचा सल्ला दिला. ग्रामस्थांनी रात्री बाहेर थांबण्याचे आवाहनही त्यांनी केले.
हेही वाचा- घनकचरा व्यवस्थापनाऐवजी थेट कचऱ्याला ‘अग्नी’; अंबरनाथमध्ये घनकचरा व्यवस्थापन नियमांची ऐशीतैशी
वेहळोली येथील काही घरांना तडे गेल्याने खबरदारीचा उपाय म्हणून याठिकाणी कापडी तंबू बांधण्यात आला आहे. या तंबूत पलंग, गाद्यांची व्यवस्था करण्यात आली असून धोकादायक स्थितीत असलेल्या घरातील आबालवृद्धांनी रात्री झोपण्यासाठी या तंबूचा निवारा घ्यावा तसेच इतर घरातील ग्रामस्थ महिलांनीही घरात न झोपता सावधगिरी बाळगून अंगणात झोपण्याचे आवाहन केले आहे. गुरुवारी वेहळोली येथील भूकंपाने तडे गेलेल्या घरांची पहाणी करत असतानाच सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास भूकंपाच्या सौम्य धक्क्याचा अनुभव उपविभागीय अधिकारी बाळासाहेब वाकचौरे यांसह त्यांच्या सोबत असलेल्या महसूल अधिकारी, कर्मचारी व ग्रामस्थांनी घेतला. भूकंपाचे धक्के बसत असतानाही परिस्थितीची पाहणी करण्यासाठी तसेच नागरिकांना दिलासा देण्यासाठी पालकमंत्री शंभूराज देसाई अद्याप आले नसल्याचा आरोप ग्रामस्थ करत आहे.