मागील सहा ते सात दिवसांपासून शहापूर तालुक्यातील काही गावांमध्ये सातत्याने भूकंपाचे हादरे बसत असल्याची माहिती समोर आली आहे. तर या भूकंपाचे केंद्रबिंदू हे शहापूर तालुक्यातील सोगाव येथील काळू नदीत असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. याची नोंद हैदराबाद येथील एनजीआरआय या संस्थेने भातसा धरणात बसविलेल्या अक्सेलोग्राफ या यंत्रात नमूद झाली आहे. तर या हादऱ्यांमुळे काही ग्रामस्थांच्या घराला तडे गेले आहेत. यामुळे गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
हेही वाचा >>>डोंबिवली: मोकाट बैलाने मारलेल्या धडकेत ज्येष्ठ नागरिकाचा बस खाली चिरडून मृत्यू
शहापूर तालुक्यातील काही गावांत मागील काही दिवसांपासून सातत्याने जमिनीला हादरे बसत असल्याची माहिती समोर आली आहे. यात २९ नोव्हेंबर रोजी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास झालेल्या हाद-याची नोंद हैदराबाद येथील एनजीआरआय या संस्थेने भातसा धरणात बसविलेल्या अक्सेलोग्राफ या यंत्रात नमूद झाली आहे. या नोंदी नुसार अक्षांश रेखांश नुसार यंत्रापासून दक्षिण – पूर्व स्थानी २४ किमी अंतरावरील वेहळोली गावानजीकच्या सोगाव येथील काळू नदीत भूकंपाचे मूळ केंद्र असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. तर याच पद्धतीने २२ नोव्हेंबर रोजीही जमिनीला हादरे बसले होते. तर यातील काही हादरे सौम्य स्वरूपाचे असल्याने त्याची यंत्रात नोंद होऊ शकली नाही. या हादऱ्यामुळे भातसा धरणाला कोणत्याही प्रकारचा धोका नसल्याचे भातसा धरण जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता योगेश पाटील यांनी स्पष्ट केले आहे. तर बुधवारी देखील दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास वेहळोली गावातील ग्रामस्थांना हादरे जाणवले. यामध्ये काही ग्रामस्थांच्या घराला तडे गेले आहे तर काहींच्या घरांची कौले पडली आहे. शहापूर तालुक्यातील सोगाव, वेहळोली, कानडी, कानवे, चेरवली, किन्हवली यागावांमध्ये अशा पद्धतीचे हादरे बसत आहेत. ग्रामस्थांच्या या नुकसानाचे पंचनामे स्थानिक तलाठ्यांकडून केली जात असल्याची माहिती तहसीलदार निलीमा सूर्यवंशी यांनी दिली आहे.