आकाराने बोरापेक्षा मोठे आणि सफरचंदापेक्षा छोटे.. चवीला सफरचंद, बोर आणि पेरूची एकत्र लज्जत.. बाकी सगळे गुण सफरचंदाचे.. नाव मात्र ‘अॅपलबोर’. मूळचे थायलंडचे हे फळ आता मुंबई, ठाण्याच्या बाजारपेठेत ग्राहकांना खुणावू लागले आहे. या फळाच्या चवीने डोंबिवलीतील वकील इंद्रजीत ठाकूर यांना अशी भुरळ घातली की कल्याणजवळच्या केळणी गावातील आपल्या जमिनीवर त्यांनी या फळाची लागवड करायला सुरुवात केली. आज, दोन वर्षांनी ठाकूर यांच्या बागेत ‘अॅपलबोर’ची २०० झाडे बहरली असून त्यातून त्यांनी तीन टनांहून अधिक फळांचे उत्पादन घेतले आहे.
थायलंडमधून आलेले ‘अॅपलबोर’ पहिल्यांदा भारतातील पश्चिम बंगालमध्ये रुजले. त्यानंतर महाराष्ट्रातील सोलापूर आणि आसपासच्या भागांतील शेतकऱ्यांनीही या फळाचे उत्पादन घेण्यास सुरुवात केली. मात्र, बहुतांश ठिकाणी ही फळे पिकवण्यासाठी रासायनिक खतांचा वापर केला जातो. परंतु, इंद्रजीत ठाकूर यांनी कटाक्षाने रासायनिक खते टाळली आहेत. कल्याण तालुक्यातील केळणी येथे जागा खरेदी करून ठाकूर यांनी सुरुवातीला
२० झाडांची लागवड केली. शेण, गोमूत्र, गूळ, सुक्या मच्छीचा कूट या माध्यमातून झाडांना झिंक आणि अमोनियासारख्या घटकांचा पुरवठा केला. पहिल्या वर्षी या प्रयोगाला अपयश आले. त्यामुळे अनेकांनी हा प्रयोग सोडून द्या, असा सल्लाही दिली. मात्र दुसऱ्या वर्षीच त्यांनी एक एकर जागेमध्ये २०० झाडांची लागवड करून प्रयोग सुरू ठेवला. डिसेंबर महिन्यामध्ये या पिकाला बहर आला. आतापर्यंत ठाकूर यांनी तीन टनांहून अधिक ‘अॅपलबोर’चे उत्पादन घेत दीड लाख रुपयांपेक्षा अधिक उत्पन्न मिळवले आहे.
कृषी विभागाचा असहकार
ठाकूर यांनी कल्याणजवळच्या या शेतीच्या जागेमध्ये शेतघराची निर्मिती केली असून या घरामध्ये कृषी पर्यटनाचा प्रयत्न त्यांनी सुरू केला आहे. त्यासाठी आवश्यक परवान्यांची पूर्तता करण्यात येणार असून लवकरच कृषी पर्यटनाचा उपक्रम इंद्रजीत यांच्या शेतात सुरू होऊ शकणार आहे. केळणी गावच्या या उपक्रमानंतर या भागातील शेतकऱ्यांना एकत्र करून इंद्रजीत यांनी समूह शेतीचा प्रयत्नही सुरू केला आहे.
कृषी विभागाकडून मात्र पुरेसे सहकार्य मिळत नसल्याची खंत इंद्रजीत व्यक्त केली. शेत तळ्याच्या उपक्रमासाठी लागणाऱ्या मदतीसाठी त्यांनी कृषी विभागात अर्ज केला मात्र कल्याणामध्ये शेतकरी नसल्याने मदत देता येणार नाही. असे उत्तर विभागातील अधिकारी वर्गाकडून मिळत असल्याने असे प्रयोग करणाऱ्यांना प्रोत्साहन देण्याची गरज त्यांनी या निमित्ताने व्यक्त केली आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा