अंबरनाथः बहुप्रतिक्षित कल्याण बदलापूर रस्त्याचे काम अंतिम टप्प्यात असतानाच येथील फॉरेस्ट नाका चौकाचे रूंदीकरण पूर्ण करण्यात आले आहे. त्यामुळे येथील वाहतूक सुरळीत होत असतानाच या चौकात कडेला अतिक्रमणांना सुरूवात झाली आहे. काटई कर्जत राज्यमार्गावरही हीच परिस्थिती आहे. भर चौकत आणि रस्त्याला हॉटेल, फळे, रस आणि खाद्यपदार्थ विक्रेत्यांनी दुकाने थाटली आहेत. येथे येणारे ग्राहक रस्त्यावरच वाहने उभी करत असल्याने वाहतूक कोंडी होते आहे. यामुळे अपघातही होण्याची भीती व्यक्त होते आहे.

कल्याणपासून उल्हासनगर, अंबरनाथ आणि बदलापूर शहरांच्या वाहतुकीसाठी महत्वाचा असलेला कल्याण बदलापूर राज्यमार्ग आता पूर्णत्वास जातो आहे. गेल्या काही वर्षांपासून कल्याण बदलापूर रस्ता मार्गी लावण्याची मागणी होती. यातील फॉरेस्ट नाका हा भाग सर्वाधिक संवेदनशील बनला होता. नादुरूस्त रस्त्यामुळे येथे अनेक अपघात झाले होते. त्यात अनेकांना नाहक जीव गमवावे लागले. रस्त्याच्या मधोमध असलेल्या उच्चदाब वाहिन्यांच्या खांबामुळे रस्त्याचा मोठा भाग व्यापला होता. तोही काही दिवसांपूर्वी काढण्यात आला. त्यामुळे आता या रस्त्याचे आणि महत्वाच्या अशा फॉरेस्ट नाका रस्त्याचे काम झाल्याने रस्ता सुरळीत झाला आहे. येथे होणारी वाहतूक कोंडीही कमी झाली आहे. मात्र चौक मोकळा होताच भर चौकाच्या कडेला अतिक्रमाणाला सुरूवात झाली आहे.

रस्त्याच्या कडेला बदलापुरच्या दिशेला जाणाऱ्या मार्गिकेवर गॅरेज, फळ विक्रेते, लस्सी, ताक, रस विक्रेते आणि खाद्यपदार्थ विक्रेत्यांनी दुकाने थाटली आहेत. या दुकानाच्या शेजारी अनेकदा इतर विक्रेत्यांच्या हातगाड्याही लागतात. काटई कर्जत राज्यमार्गावर हीच परिस्थिती आहे. काही ग्राहक खाद्यपदार्थ घेण्यासाठी, खाण्यासाठी येथे वाहने उभी करत असतात. त्यामुळे अनेकदा बदलापूरकडे जाणाऱ्या मार्गिकेचा आणि चौकाचा मोठा भाग व्यापला जातो. त्यामुळे अनेकदा येथे वाहतूक कोंडी होत असते. बदलापुरहून येणाऱ्या मार्गिकेच्या शेजारीही अशाच खाद्यपदार्थांच्या दुकानांमुळे वाहनांची गर्दी होते. परिणामी येथून वाहने काढताना इतर वाहनचालकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागते. या वाहनांमुळे आता कोंडी होण्यास सुरूवात झाली आहे. मात्र भर रस्त्यात उभ्या राहणाऱ्या या ग्राहकांच्या वाहनांमुळे अपघात होण्याचीही भीती व्यक्त होते आहे. त्यामुळे या कोंडी आणि अपघाताच्या शक्यतेला कारणीभूत असलेल्या बेकायदा दुकानांवर कारवाई करण्याची मागणी आता होऊ लागली आहे. या अतिक्रमाणांवर वेळीच निर्बंध न घातल्यास त्यांचे प्रमाण वाढण्याची भीती व्यक्त होते आहे.

नवा कोरा रस्ता पार्किंगसाठी
कल्याण बदलापूर राज्यमार्गाचे बहुतांश ठिकाणी रुंदीकरण झाले आहे. मात्र या रस्त्याचा वापर आता मोठ्या अवजड वाहने, बस आणि गॅरेजच्या नादुरुस्त वाहनांना उभे करण्यासाठी केला जातो आहे. त्यामुळे अनेकदा रस्त्याचा मोठा भाग व्यापला जातो आहे.

Story img Loader