भगवान मंडलिक
शहरी नागरिकांचा काही वर्षापासून जंगलातील पर्यटन स्थळांकडे अधिक ओढा दिसू लागला आहे. अनेक नागरिक घरापासून एक ते दोन तासाच्या अंतरावर असणाऱ्या पर्यटन स्थळांना सर्वाधिक पसंती देऊ लागले आहेत. वर्षानुवर्ष ठरावीक जंगल भागातील पर्यटन स्थळ पाहून अन्य जंगली पर्यटन स्थळांच्या शोधात असलेल्या पर्यटकांना नवीन पर्यटन स्थळे उपलब्ध करुन द्यावीत, या विचारातून ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यातील तानसा अभयारण्य क्षेत्रात चार नवीन पर्यावरणस्नेही पर्यटन स्थळे विकसित करण्याचा विचार वन्यजीव विभागाने सुरू केला आहे.

हेही वाचा – कल्याण मध्ये दुचाकी, मोटार चोरांचा धुमाकूळ; एकाच दिवशी दोन मोटार, एक दुचाकींची चोरी

तानसा, क्वारीपाडा, माहुली, सूर्यमाळ भागात ही पर्यटन केंद्र विकसित केली जाणार आहेत. अभयारण्यामध्ये ही पर्यटन स्थळे विकसित करताना वनसंपदा, वन्यजीव यांना कोणत्याही प्रकारची हानी न पोहचविता नैसर्गिक पध्दतीने या पर्यटन स्थळांचा विकास करण्याचा वन्यजीव विभागाचा विचार आहे. नागरिकांना जंगल, प्राणी, निसर्ग याविषयी गोडी वाटावी. कुटुंबासह पर्यटनाला येऊन झाडे, प्राणी, वनस्पती, फुले, वेली यांची माहिती घेऊन त्यांचे संवर्धन होण्यासाठी या पर्यटन स्थळाच्या माध्यमातून प्रयत्न करावेत. हाही तानसा अभयारण्यातील पर्यावरणपूरक पर्यटन स्थळे विकसित करण्या मागील मुख्य उद्देश आहे, असे वन्यजीव अधिकाऱ्याने सांगितले.

पर्यावरणस्नेही पर्यटन स्थळ विकसित करणाऱ्या एका खासगी संस्थेच्या एक प्रकल्प आराखडा तयार करण्यात येईल. तो प्रशासकीय मान्यतेसाठी वरिष्ठांकडे पाठविण्यात येईल. या मंजुरीनंतर चारही ठिकाणची पर्यावरणस्नेही पर्यटन स्थळे विकसित करण्याची कार्यवाही सुरू केली जाणार आहे, असे अधिकारी म्हणाला.

मार्गदर्शन केंद्र
चारही पर्यटन केंद्रात जंगल भ्रमंती, वन्यजीव, वनसंपदा अभ्यासक आणि मार्गदर्शक, पक्षी, प्राणी निरीक्षण मनोरे, जैवविविधता मार्गदर्शन केंद्र उभारण्यात येणार आहेत. पर्यटकांना उन्हाळा, हिवाळ्यात राहुट्या पध्दतीची निवासाची घरे, भोजन व्यवस्था, पावसाळ्यासाठी पक्की निवास व्यवस्था पर्यटन स्थळी केली जाणार आहे. अभयारण्य परिसरात राहणाऱ्या रहिवाशांना या पर्यटन स्थळांच्या माध्यमातून रोजगाराचे साधन उपलब्ध करुन देणे हाही या उपक्रमा मागील उद्देश आहे, असे अधिकाऱ्याने सांगितले.

हेही वाचा – ठाणे पालिका म्हणतेय शहरात १३८ खड्डे; यंदा गणेश मूर्तीचे आगमन खड्ड्यातून होणार?

या भागातील कष्टकरी रहिवासी मजुरीसाठी परिसरातील गावे, तालुक्याच्या ठिकाणी जातात. त्यांना या उपक्रमामुळे गाव परिसरात रोजगाराचे साधन उपलब्ध होणार आहे. पर्यटन स्थळ केंद्रात स्थानिकांना प्राधान्य दिले जाणार आहे. त्यांना जंगलाची इत्यंभूत माहिती असते. त्यांच्या जवळील माहितीचा स्थळे विकसित करताना सल्ला घेतला जाणार आहे, असे अधिकाऱ्याने सांगितले.

विविध भागातून येणाऱ्या पर्यटकांना जंगल भागातील आदिवासी जीवन, त्यांची संस्कृती, त्यांची गाणी, नृत्य, भोजन याची माहिती देण्याची व्यवस्था केली जाणार आहे. या माध्यमातून स्थानिकांना रोजगार मिळून दिला जाईल. मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या तानसा, मोडकसागर, मध्य वैतरणा धरणाचे हे लाभक्षेत्र आहे. जंगलातील अवाढव्य दगड आकर्षित पध्दतीने रंगवून त्यावर सुरक्षित सेल्फी पाॅईंट तयार करणे. लहान मुलांना मौज करण्यासाठी मैदान विकसित करणे, महत्वाची झाडे, फूलपाखरे, प्राण्यांची छायाचित्र पर्यटन स्थळी लावली जाणार आहेत.

मुंबईपासून जवळ
अनेक नागरिक एक दिवसाच्या पर्यटनाला सर्वाधिक पसंती देतात. मुंबई, नवी मुंबई, ठाणे, वसई-विरार, पनवेल शहरांपासून तानसा अभयारण्य एक ते दोन तासाच्या अंतरावर आहे. दिवसभर पयर्टन करुन नागरिक संध्याकाळी परत जाऊ शकतात. देश, परदेशातील पर्यटक येथे पर्यटन, निसर्ग भ्रमंती, अभ्यासक म्हणून त्या दृष्टीने ही स्थळे विकसित केली जाणार आहेत, असे अधिकारी म्हणाला. या माध्यमातून वन्यजीव विभागाला महसूल मिळणार असून त्या माध्यमातून पर्यावरण संवर्धनाचे उपक्रम अधिक गतीने राबविणे शक्य होईल. तानसा अभयारण्य क्षेत्रात सहा तपासणी नाके आहेत. विविध प्रकारच्या वाहतुकीतून या नाक्यावर दरमहा सुमारे दोन ते तीन लाख रुपये महसूल जमा होतो. पर्यटन स्थळे सुरू झाल्यानंतर या महसुलात वाढ होणार आहे, असे अधिकाऱ्याने सांगितले.

Story img Loader