येत्या काळात अभ्यासक्रमामध्ये कौशल्य विकास प्रशिक्षणाला विशेष महत्त्व असणार आहे . या माध्यमातून शालेय स्तरावरच विद्यार्थ्यांची कौशल्य विकासासाठी मानसिकता तयार होईल. तरुणांना प्रशिक्षणानंतर नोकऱ्या मिळतील. त्यामुळे शैक्षणिक संस्थानी कौशल्य विकास प्रशिक्षण अभ्यासक्रम सुरू करावेत. यासाठी राज्यशासन सर्वतोपरी मदत करेल, असे प्रतिपादन राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी शनिवारी येथे केले.
कल्याण जवळील गोवेली येथील जीवनदीप शैक्षणिक संस्थेच्या वतीने प्रवचनकार व किर्तनकारांच्या सत्कार कार्यक्रमात मंत्री पाटील बोलत होते.यावेळी आ. किसन कथोरे, आ. कुमार आयलानी, माजी आ. नरेंद्र पवार, संस्थेचे संस्थापक रवींद्र घोडविंदे, रेश्मा मगर, अरुण पाटील, चंद्रकांत कोष्टे उपस्थित होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>> ठाणे : खासगी कंपनीद्वारे ५४ जणांची ९ कोटी रुपयांची फसणूक ; चार जणांविरोधात गुन्हा दाखल

प्रा. राजाराम कापडी लिखित ‘ग्रंथालय संघटन’ आणि सुनीलदत्त तवरे लिखित ‘संतांचे तत्वज्ञान’ या पुस्तकांचे प्रकाशन मंत्री पाटील यांच्या हस्ते झाले.कीर्तनकार नवनित्यानंद महाराज यांच्यासह परिसरातील किर्तनकारांचा सत्कार करण्यात आला. विविध स्पर्धेत यश मिळविलेल्या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना यावेळी गौरविण्यात आले.मंत्री पाटील म्हणाले की, देशात आता नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण राबविण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांना जे जे शिकायचे आहे ते ते शिक्षण मिळेल. मातृभाषेतून शिक्षण मिळाल्याने विद्यार्थ्यांना विषयाचे समग्र ज्ञान मिळेल. हे शिक्षण मातृभाषेतून व्हावे यासाठी प्रधानमंत्री आग्रही आहेत. तंत्रशिक्षण, अभियांत्रिकी व कायद्याचे शिक्षण हे मातृभाषेतून मिळण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. पुढील काळात जगाची ज्ञानाची गरज भारत पूर्ण करेल. कीर्तनकार हे लोकांच्या मनात उतरून समाजाला दिशा देण्याचे काम करतात. नवीन शैक्षणिक धोरण पोचविण्याचे काम किर्तनकार व प्रवचनकारांनी करावे, असेही मंत्री पाटील म्हणाले.

यावेळी आमदार कथोरे म्हणाले, सामाजिक बांधिलकी टिकवताना विकास हा हेतू ठेवला आहे. अंबरनाथ, मुरबाड सारख्या ग्रामीण भागात जीवनदीप शैक्षणिक संस्थेने शिक्षणाचा विकास करून या भागातील मुलांना दिशा दिली आहे. संस्थेचे संस्थापक रवींद्र घोडविंदे यांनी प्रास्ताविक केले.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Educational institutions should emphasize skill training statement by higher and technical education minister chandrakant patil amy
Show comments