आर्थिकदृष्टय़ा दुर्बल वर्गातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक शिष्यवृत्ती
गुणवत्ता असलेला कुणीही विद्यार्थी केवळ आर्थिक कुवत नसल्याने उच्च शिक्षणापासून वंचित राहू नये म्हणून शासनाने सहा लाख रुपये उत्पन्न गटातील सात लाख विद्यार्थ्यांना सवलती देण्याचा निर्णय आता जाहीर केला असला तरी अशा प्रकारची चळवळ ठाण्यात गेली सहा वर्षे सुरू असून त्याद्वारे शेकडो मुला-मुलींना कोटय़वधी रुपयांची शैक्षणिक मदत देण्यात आली आहे.
यंदा या उपक्रमात राज्यभरातील १५ जिल्ह्य़ांतील १३२ विद्यार्थ्यांना तब्बल ८० लाख रुपये उच्च शिक्षणासाठी देण्यात आले आहेत. शिष्यवृत्ती म्हणून दिल्या जाणाऱ्या या सवलतीचा लाभ घेऊन विविध विषय शाखांमधील उच्चशिक्षण पूर्ण केलेले ११ उमेदवार कॅम्पस मुलाखतीद्वारे टाटा कन्सल्टन्सी, एल अॅण्ड टी, सीमेन्स, एचडीएफसी, महेंद्रा आदी कंपन्यांमध्ये निवडले गेले आहेत. ‘इटस् टाइम टु गिव्ह’ या भावनेने आर्थिकदृष्टय़ा गरीब परंतु गुणवंत विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी निरपेक्ष मदत करणारी ही चळवळ पुढील शैक्षणिक वर्षांपासून ठाण्याबरोबरच मुंबई, पुणे, नाशिक, सांगली आणि कोल्हापूर या शहरांमध्येही सुरू होत असल्याची माहिती या योजनेचे समन्वयक रवींद्र कर्वे यांनी दिली. यानिमित्ताने समाजातील संवेदनशील वृत्तीचेच सीमोल्लंघन होत आहे.
‘टीजेएसबी’बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी असणाऱ्या रवींद्र कर्वे यांनी सेवा निवृत्तीनंतर पूर्णवेळ समाजासाठी कार्य करण्याचे ठरविले. त्याचाच एक भाग म्हणून आर्थिकदृष्टय़ा दुर्बल घटकातील मुलांना उच्च शिक्षणासाठी ‘दाते’ मिळवून देण्याचे काम त्यांनी सुरू केले.
दहावीला नव्वद टक्के गुण मिळविलेला कोणत्याही गरजू विद्यार्थ्यांला या योजनेतून उच्च शिक्षणासाठी मदत दिली जाते. या योजनेमुळे शेकडो गुणवंत विद्यार्थ्यांना त्यांच्या कुवतीनुसार वैद्यकीय, अभियांत्रिकी तसेच इतर विषय शाखांमधील शिक्षण घेणे शक्य झाले आहे. त्यातील दोघे अमेरिकेत तर प्रत्येकी एक इंग्लड आणि जर्मनीमध्ये उच्च शिक्षण घेत आहे. गेली काही वर्षे ठाण्यातील ही चळवळ पाहून प्रभावित झालेल्या अन्य शहरांतील नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने आपापल्या भागात ही योजना राबविण्याचे ठरविले आहे. त्यानुसार २०१७-१८ या शैक्षणिक वर्षांत मुंबई, पुणे, नाशिक, सांगली आणि कोल्हापूर या पाच शहरांमध्ये ही योजना राबवली जाणार आहे.
अशी आहे योजना
दहावीचे निकाल लागल्यानंतर राज्यभरातील कार्यकर्ते आणि परिचितांकडून गुणवंत विद्यार्थी निवडले जातात. अत्यंत प्रतिकुल परिस्थितीतीतही दहावीत ९० टक्के गुण मिळविणारे विद्यार्थी या शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरतात. त्याचा सर्व खर्च विशिष्ट दात्याकडून दिला जातो. मात्र आपल्याला कोण मदत करतोय, हे विद्यार्थ्यांना तसेच आपले पैसे कुणासाठी वापरले जाताहेत, हे दात्यांना माहिती नसते. त्यामुळे उपकाराची भावना आणि कृतज्ञतेचे ओझे वाहण्याचा प्रश्न येत नाही. या योजनेतून मिळणारी मदत ही फक्त शैक्षणिक प्रगतीवर अवलंबून असते. याव्यतिरिक्त कोणत्याही अटी-शर्ती नसतात. दरवर्षी नोव्हेंबर महिन्यात संबंधित दाते, विद्यार्थी, पालक आणि हितचिंतकांचा मेळावा ठाण्यात आयोजित केला जातो.
आणि त्यांनी देणाऱ्याचे हात घेतले..
या योजनेतील ‘दाते’ आपले दान सत्पात्री पडले यातच समाधानी असतात. या व्यतिरिक्त त्यांना कोणत्याही परताव्याची अथवा परतफेडीची अपेक्षा नसते. मात्र या योजनेतून शिक्षण पूर्ण करून नोकरीला लागलेल्या विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे ‘देणाऱ्याचे हात’ हाती घेण्यास सुरूवात केली आहे. वार्षिक उत्पन्नातून पाच हजार रूपये गरजू विद्यार्थ्यांना मदत देण्यास त्यांनी सुरूवात केली आहे. अशाप्रकारे आतापर्यंत साडेतीन लाख रूपये विद्यार्थ्यांकडून मिळाले आहेत.