शालेय विद्यार्थ्यांच्या सर्वागीण विकासाला प्राधान्य देत वर्षभर वैविध्यपूर्ण उपक्रम शाळांमधून राबवले जात असतात. उपक्रम, कार्यशाळा, स्पर्धा (कला/क्रीडा, सांस्कृतिक) प्रदर्शने, शिबिरे, आनंदबझार इ. स्वरूपाचे अनेकविध उपक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या विविध क्षमता विकसित करण्याबरोबर त्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासाच्या दृष्टीने विचार केला जातो. स्नेहसंमेलन आणि प्रदर्शने यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमधील कलागुण आणि सर्जनशीलतेला वाव मिळतो आणि त्यामुळे विद्यार्थ्यांसाठी ते हक्काचे व्यासपीठ असते. पूर्व प्राथमिक, प्राथमिक आणि माध्यमिक विभागात कल्पकतेने आयोजित केलेली प्रदर्शने हा एक अतिशय सुंदर अनुभव असतो. सर्वसाधारणपणे पूर्वप्राथमिक विभागात विद्यार्थ्यांना कशा पद्धतीने आणि विशेषत: शैक्षणिक साधनांच्या साहाय्याने, हसतखेळत व आनंददायी शिक्षणपद्धतीचा अवलंब करीत कसे शिकवले जाते त्यावर भर दिला जातो. प्राथमिक विभागात चित्रकला, हस्तकला, चिकणमाती काम, टाकाऊतून टिकाऊ इ. साहाय्याने अभ्यासक्रमाचा वेध घेतला जातो. या प्रदर्शनांमधून मग विविध सण, समाजाचे सेवक, वाहने (बैठे, मैदानी, पारंपरिक इ.) महाराष्ट्राची संस्कृती, शेती आणि पिके इ. स्वरूपाचे विषय मोठय़ा प्रमाणावर दिसून येतात. काही शाळा मग गणित, भूगोल, विज्ञान या विषयांमधील काही विषय निवडून त्यावरील प्रतिकृती, माहितीपूर्ण तक्ते, शैक्षणिक खेळ इ. माध्यमांच्या साहाय्याने प्रदर्शन आयोजित करतात. माध्यमिक विभागात चित्रकला, हस्तकला, गणित, विज्ञान इ. विषय अधिक विस्ताराने हाताळून भव्य प्रदर्शनांचे आयोजन केले जाते. या प्रदर्शनांमधून चित्रकलेचे (पेंटिंग, पेन्सिलशेडिंग, ठसे काम, नखशिल्पे इ. प्रकार) हस्तकलेचे (पुठ्ठा/कागद/ करवंटय़ा/पेन्सिसची साले/ वाळलेली फुले पाने इ.)च्या अनेक आकर्षक कलाकृती, कापडावरील पेंटिंग, टाकाऊतून टिकाऊच्या माध्यमातून केलेल्या वैविध्यपूर्ण कलात्मक वस्तू पेपर क्विलींगच्या वस्तू, आर्टिफिशिअल/ इमिटेशन दागिने इ. गोष्टी अनुभवता येतात. विज्ञान आणि गणितामधल्या मूलभूत संकल्पना, मुलभूत तत्त्वे यावर आधारीत अनेक प्रतिकृती, खेळ विद्यार्थी तयार करतात (आणि उपस्थितांना/ येणाऱ्यांना समजावून सांगतात.) शाळेच्या आणि विद्यार्थ्यांच्या प्रगतीचा (त्यामागील परिश्रमांचा) आढावा शाळेला पालकांना घेता येतो आणि शाळेसाठी ती अत्यंत अभिमानाची बाब असते. त्यामुळे शाळा, विद्यार्थी आणि पालक या प्रदर्शनाची आतुरतेने वाट पाहात असतात.
यावर्षी डॉ. बेडेकर विद्यामंदिर, पूर्वप्राथमिक विभागात शैक्षणिक साधनांचे प्रदर्शन मांडण्यात आले होते. या शाळेमध्ये आंबा, पपई, डाळिंब, अननस, सफरचंद असे पाच गट असून, गटाप्रमाणे विषय देणात आले होते. आंबा गट-भाषा, पपई गट- हस्तकला, चित्रकला, डाळिंब गट- गणित, अननस गट- जीवन व्यवहार, सफरचंद गट- सामान्यज्ञान असे हे विषय होते. शैक्षणिक साधनांचा विचार शिक्षणाच्या क्षेत्रात व विशेषत: बालशिक्षण व प्राथमिक शिक्षण यांच्या क्षेत्रात वर्षांनुवर्षे केला जात आहे. शैक्षणिक साधनांचा उपयोग करून मुलांना शिक्षण दिले जाते याची माहिती पालकांना आणि मुलांना व्हावी आणि साधनांचा परिचय व्हावा या हेतूने या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. पूर्व प्राथमिक विभागातील पाच दालनांमध्ये शैक्षणिक साधनांचे मांडलेले हे प्रदर्शन पाहण्यासारखे होते आणि या विभागाने घेतलेली मेहनत अनुभवता येत होती.
भाषा- गोष्टी, गाण्याचे प्रकार, लेखनपूर्व तयारी, मुळाक्षरे, शब्द, वाक्य, काना, कान्याची वाक्ये, शब्द व चित्र जोडय़ा, समानार्थी शब्द, लिंग ओळख, एकवचन, अनेकवचन, नातेसंबंध, चित्रवर्णन.
गणित- अंक ओळख, क्रमवारी मोजणी, चढता-उतरता क्रम, मधला/पुढचा/मागचा अंक लिहिणे, चिन्हांची ओळख, बेरीज, वजाबाकी, वजन, आकारमानातील फरक, अपूर्णाकाची ओळख, शून्याची संकल्पना.
जीवन व्यवहार- चाळणे, पाखडणे, निवडणे, दळणे, चिरणे, वाटणे, कापणे, कुटणे, किसणे, कपडय़ांच्या घडय़ा घालणे, बुटात लेस घालणे, मणी ओवणे, मनोरा रचणे, लाटणे, केर काढणे.
सामान्यज्ञान- जंगली/पाळीव प्राणी, जलचर/उपजलचर प्राणी, रंगांचा परिचय, फुले-वासाची/बिनवासाची, बाळाचे कपडे, प्रथोपचाराची साधने, चवींचा परिचय, पक्षांचा परिचय, धातूंचा परिचय, प्रकाश देणाऱ्या, उष्णता देणाऱ्या, विजेवर चालणारी साधने, पूजेचे साहित्य, आंघोळीचे साहित्य, दागिन्यांचा परिचय, भाज्या-फळभाज्या-पालेभाज्या-कंदभाज्या, घरांचे प्रकार.
हस्तकला चित्रकला- चित्र काढणे, चिकटकाम, कोलाज काम, होडी, घर, कपबशी, फ्रेम, छत्री बनवणे, मातीकाम.
दरवर्षी एक विषय निवडून सर्वागाने त्याचा वेध घेत ते प्रदर्शन परिश्रमपूर्वक मांडण्यावर भर देण्याची या विभागाची परंपरा दिसून येते. गेल्या वर्षी समाजाचे सेवक हा प्रकल्पदेखील याच स्वरूपाने मांडण्यात आला होता. धोबी, सोनार, कुंभार, माळी, बुरूड काम करणारा, न्हावी, चांभार, वाणी, सोनार, गवंडी, शेतकरी, असे तीस सेवकांचा या प्रदर्शनात समावेश होता. प्रत्येक सेवकाचे चित्र आणि त्याचे साहित्य असे या प्रदर्शनात मांडण्यात आले होते. धोबी-कपडे धुण्याचा दगड, साबण, धोपटणे, ब्रश इ. सुतार- करवत, रंधा, लाकडे, हातोडी, खिळे इ. न्हावी- आरसा, कात्री, खुर्ची, फवारा, कंगवा, कापलेले केस. सोनार- छोटा तराजू, निखारे भरलेली बादली, फुंकणी, दागिने. अशा तऱ्हेने प्रत्येक सेवक कशा प्रकारे काम करतो आणि त्याला कोणकोणते साहित्य लागते ते काळजीपूर्वक आणि बारकाईने विचार करून मांडण्यात आले होते.
कळव्यामधील ज्ञानप्रसारिणी शाळा (भाऊ कुंटे यांची शाळा) या शाळेतील पूर्वप्राथमिक विभागातदेखील दरवर्षी एक विषय घेऊन सर्वागाने वेध घेत अभ्यासपूर्ण रीतीने प्रदर्शनाची मांडणी केली जाते. कळवा, विटावा, ठाकूरवाडी येथील शाळांचे पूर्वप्राथमिक विभागांचे हे संयुक्त प्रदर्शन असते.
या वर्षी टाकाऊतून टिकावू- विषयाअंतर्गत कागद, पुठ्ठा, पेन्सिलची साले, चॉकलेटचे कागद, काडेपेटीच्या काठय़ा, आइस्क्रीमचे चमचे, खोके इ.पासून अतिशय सुंदर आणि कलात्मक वस्तू कल्पकतेने तयार करण्यात आल्या होत्या. करवंटीपासून तबला डग्गा, बाहुली, कासव तयार करण्यात आले होते. पेन्सिलच्या सालांपासून फुले, घरांचे आकार तर चॉकलेटच्या कागदापासून फटाके, फुले, फुलपाखरे खुप सुंदर केली होती. डाळींपासून फळाफुलांचे आकार तयार करण्यात आले होते. पुठ्ठा/आइस्क्रीमचे चमचेपासून अतिशय वैविध्यपूर्ण घरे तयार करण्यात आली होती. खोक्यांपासून घरे, टी.व्ही., रेडिओ, गॅसची शेगडी, उशी, गादीसहित पलंग, घडय़ाळ इ. अनेकविध गोष्टी प्रदर्शनात मांडण्यात आल्या होत्या.
गेल्या वर्षी शहराकडून जंगलाकडे असा विषय होता आणि त्यामध्ये जंगलातले विविध प्राणी, पशू, पक्षी, झाडे-झुडपे, वृक्ष, औषधी वनस्पती इ. गोष्टी मांडण्यात आल्या होत्या. टाकाऊतून टिकाऊच्या माध्यमातून पशू/पक्षांची घरे, झाडे आकर्षकरीत्या तयार करण्यात आली होती. शक्य होती ती झाडे आणि औषधी वनस्पतींचे काही नमुने विद्यार्थ्यांना/पालकांना प्रत्यक्ष पाहता आले. त्याच्या आधीच्या वर्षी समाजातील सेवक प्रदर्शनाअंतर्गत सेवकांची चित्र व त्यांचे सर्व साहित्य अभ्यासपूर्वक मांडण्यात आले होते. विशेष म्हणजे या शाळांचे विद्यार्थी तेथे स्वत: बसलेले असतात आणि ज्या गोष्टी मांडलेल्या असतात त्याची ते आत्मविश्वासपूर्वक माहिती देतात, त्यांचा उपयोग सांगतात, त्यांचे महत्त्व सांगतात, हे विशेष.
हेमा आघारकर

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा