लोकसत्ता खास प्रतिनिधी

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

कल्याण : कल्याण येथील बालिकेच्या हत्या प्रकरणात ज्येष्ठ विधिज्ञ ॲड. उज्ज्वल निकम यांनी सरकार पक्षातर्फे न्यायालयात बाजू मांडावी यासाठी आपण स्वता शासनस्तरावर प्रयत्न करणार आहे. नवी मुंबईतील अशाच एका पीडित महिलेच्या प्रकरणात ॲड. निकम यांनी न्यायालयात महत्वाची भूमिका बजावली होती. कल्याणमधील बालिकेचे हत्याप्रकरण न्यायालयात चालविण्यासाठी ॲड. निकम यांची शासनाने तातडीने नियुक्ती करावी यासाठी आपण आग्रही असणार आहोत, अशी माहिती राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांनी शनिवारी येथे माध्यमांना दिली.

मृत बालिकेच्या कुटुंबीयांची भेट घेण्यासाठी वनमंत्री गणेश नाईक शनिवारी कल्याणमध्ये आले होते. त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. बालिकेच्या हत्येनंतरही पीडित कुटुंब अद्याप दहशतीखाली असल्याची माहिती मिळाली. अद्याप या भागात कोणाची तरी दहशत आहे. त्यांची या कुटुंबीयांना भीती आहे, अशी माहिती मिळाल्याने या कुटुंबीयांना दिलासा देण्यासाठी आणि शासन आपल्या पाठीशी ठाम आहे हे सांगण्यासाठी आपण पीडित कुटुंबीयांना भेटण्यासाठी आलो आहोत, असे वनमंत्री नाईक यांनी सांगितले.

आणखी वाचा-घराला आग लावून पती पत्नीला जिवंत जाळण्याचा प्रयत्न

या प्रकरणातील गुन्हेगाराला कायद्याच्या चौकटीतून कठोरात कठोर शिक्षा होईल यासाठी शासनाचे सर्वोतपरी प्रयत्न असतील. याप्रकरणात सरकार पक्षातर्फे न्यायालयात बाजू मांडण्यासाठी ज्येष्ठ विधिज्ञ ॲड. उज्ज्वल निकम यांची नेमणूक करण्यात यावी यासाठी आपण शासनाकडे प्रयत्नशील असणार आहोत. तसेच आपण स्वता यासंदर्भात ॲड. निकम यांच्याशी बोलणार आहोत, असे वनमंत्री नाईक यांनी सांगितले.

बालिकेच्या गुन्हेगाराला अशी काही शिक्षा होईल की समाजात पुन्हा असे कृत्य करण्यासाठी धजावणार नाही. हा समाजात संदेश जाण्यासाठी या प्रकरणातील गुन्हेगाराच्या कठोरातील कठोर शिक्षेसाठी शासन प्रयत्नशील असणार आहे. समाजात अशा कृत्यांसाठी कोणी दहशत माजवून कुटुंबीयांना त्रास देत असेल तर त्यांचा बंदोबस्त करण्यासाठी शासन तत्पर आहे. त्यामुळे कोणीही अशा दहशतीला घाबरू नये. पोलिसांनी या प्रकरणाच्या तपासात कोणत्याही त्रृटी ठेऊ नये आणि हे प्रकरण लवकरात लवकर जलदगती न्यायालयात चालवून बालिका हत्याप्रकरणातील गुन्हेगाराला कठोर शिक्षा होईल यासाठी शासन प्रयत्नशील असेल, असे वनमंत्री नाईक यांनी सांगितले.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Efforts are being made to appoint adv ujjwal nikam in girls murder case says ganesh naik mrj