लोकसत्ता खास प्रतिनिधी

ठाणे: भारत जोडो यात्रा आणि हात जोडो यात्रांपाठोपाठ आता जय भारत सत्याग्रह हा कार्यक्रम करण्याचा निर्णय अखिल भारतीय काँग्रेस पक्षाने घेतला असून या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र प्रदेश कमिटीच्या विस्तारित कार्यकारणीची बैठक पहिल्यांदाच ठाण्यात आयोजित करण्यात आली आहे. याशिवाय, जय भारत सत्याग्रह या कार्यक्रमाची सुरुवातही ठाण्यातून केली जाणार आहे. या निमित्ताने गेल्या काही वर्षांपासून अस्तित्व कमी झालेल्या आणि मरगळलेल्या अवस्थेत असलेल्या ठाणे जिल्ह्यातील काँग्रेसला पुनर्जिवत करण्याचे प्रयत्न सुरु झाल्याचे चित्र आहे. तसेच राजकीय महत्व वाढलेल्या ठाणे जिल्ह्यावर सर्वच पक्षांपाठोपाठ आता काँग्रेसने लक्ष केंद्रीत केल्याचे दिसून येत आहे.

शिवसेनेतील बंडखोरीनंतर महाविकास आघाडीचे सरकार कोसळले आणि बंडखोरीचे नेतृत्व करणारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाजपसोबत नवे सरकार स्थापन केले. या राजकीय नाट्यनंतर राज्यातील सत्ताबदलाचे आणि शिवसेनेतील बंडखोरीचा केंद्रबिंदू ठरलेल्या ठाणे जिल्ह्याचे राजकीय महत्व गेल्या काही महिन्यात वाढले आहे. जिल्ह्यातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मोठे समर्थन मिळाले असून त्यांच्याकडून सातत्याने जोरदार शक्तीप्रदर्शन केले जात आहे. तर, त्यांचे विरोधक असलेल्या महाविकास आघाडीकडूनही शक्तीप्रदर्शन करून आपली ताकद दाखविण्यात येत आहे. विविध मोर्चे, आंदोलने आणि सभांच्या माध्यमातून महाविकास आघाडीतील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि राष्ट्रवादी हे दोन्ही पक्ष शक्ती प्रदर्शन करीत असले तरी त्या तुलनेत त्यांचा मित्र पक्ष असलेल्या काँग्रेस पक्षाचे काहीसा मागे पडल्याचे चित्र आहे. असे असतानाच, आता सर्वच पक्षांपाठोपाठ काँग्रेसनेही ठाणे जिल्ह्यावर लक्ष केंद्रीत केले असून जिल्ह्यात पक्षाला आलेली मरगळ दूर करून पक्षाची ताकद वाढविण्यासाठी प्रयत्न सुरु केल्याचे चित्र आहे. त्याचाच एक भाग म्हणून जय भारत सत्याग्रह हा कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र प्रदेश कमिटीच्या विस्तारित कार्यकारणीची बैठक पहिल्यांदाच ठाण्यात आयोजित करण्यात आली आहे. याशिवाय, जय भारत सत्याग्रह या कार्यक्रमाची सुरुवातही ठाण्यातून केली जाणार आहे.

आणखी वाचा- सिंहगड एक्सप्रेसमध्ये बिहारच्या शिक्षकाकडून महिलेचा विनयभंग

महाराष्ट्र प्रदेश कमिटीच्या विस्तारित कार्यकारणीची बैठक पहिल्यांदाच ठाण्यात पार पडणार असून त्याचबरोबर जय भारत सत्याग्रह या कार्यक्रमाची सुरुवातही यावेळी केली जाणार आहे. येत्या १० एप्रिलला ठाणे येथील गडकरी रंगायतनमध्ये हा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमासाठी प्रदेश प्रभारी एच. के. पाटील, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विधीमंडळ नेते बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे, अशोक चव्हाण आणि पृथ्वीराज चव्हाण हे उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती ठाणे काँग्रेसचे शहराध्यक्ष विक्रांत चव्हाण यांनी दिली.

एकेकाळी ठाणे जिल्ह्यात काँग्रेस पक्षाची मोठी ताकद होती. परंतु गेल्या काही वर्षात पक्षाची ताकद कमी झाल्याचे दिसून येते. महापालिकांमध्ये नगरसेवकांची संख्या कमी झालेली आहे. असे असतानाच, गेल्या काही महिन्यात राजकीय महत्व वाढलेल्या ठाण्यावर काँग्रेस नेत्यांनी लक्ष केंद्रीत करत प्रदेश पातळीच्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यास सुरुवात केली आहे. यानिमित्ताने दुचाकी रॅली, शहरभर फलकबाजी अशी वातावरण निर्मिती करण्याचे नियोजन नेत्यांनी आखले आहे. यानिमित्ताने अस्तित्व कमी झालेल्या ठाणे जिल्ह्यातील काँग्रेस पक्षाला पुर्नजिवत करून उभारी देण्याचे काम काँग्रेसच्या प्रदेश नेत्यांनी सुरु केल्याचे चित्र आहे.

Story img Loader