सागर नरेकर
अंबरनाथ : उल्हासनगर, अंबरनाथ आणि बदलापूर या शहरांमध्ये लोकसंख्या वेगाने वाढली. पर्यायाने वाहनांची संख्याही वाढली. मात्र त्याच वेळी पूर्व-पश्चिम प्रवासासाठी रेल्वे रुळांवरील उड्डाणपुलांची संख्या मर्यादितच राहिली. आता ‘एमएमआरडीए’च्या माध्यमातून कल्याण पूर्व ते शहाड हे कल्याणचे दुसरे टोक तसेच, अंबरनाथ आणि बदलापूर शहरातील पूर्व आणि पश्चिम भाग जोडण्यासाठी नवे उड्डाणपूल प्रस्तावित आहेत. यामुळे वाहतुकीसाठी नवे मार्ग उपलब्ध होणार आहेत.
कल्याण पूर्वेतील विठ्ठलवाडी परिसर आणि कल्याण पश्चिम भागात येणारा शहाड परिसरापासून तसा भौगोलिकदृष्टय़ा दूर नाही. मात्र, या वालधुनी, रेल्वे मार्ग ओलांडत विठ्ठलवाडी परिसरातून प्रवास करत शहाड भागात जाणे तितकेसे सोपे नाही. त्यासाठी थेट मार्गही नाही. त्यामुळे एकाच शहराची दोन टोके दूर असल्यासारखी वाटतात.
जुना कल्याण पुणे लिंक रस्ता या नावाने ओळखल्या जाणाऱ्या विठ्ठलवाडी परिसरातून शहाड परिसरात जाण्यासाठी मोठी कसरत करावी लागते. मात्र, आता विठ्ठलवाडी भागातून थेट कल्याण अहमदनगर महामार्गाला जोडण्यासाठी नव्या उड्डाणपुलाची निर्मिती केली जाणार आहे. ‘एमएमआरडीए’च्या माध्यमातून या पुलाची उभारणी केली जाणार आहे. त्यासाठी ४४० कोटींचे ढोबळ अंदाजपत्रक तयार करण्यात आले आहे. त्यामुळे कल्याण अहमदनगर राष्ट्रीय महामार्गावरून थेट कल्याण पूर्व, विठ्ठलवाडी आणि उल्हासनगरच्या पूर्व भागात पोहोचणे सोपे होणार आहे.अंबरनाथ शहरात लवकरच दोन उड्डाणपुलांची उभारणी केली जाणार आहे. त्यासाठी ५० कोटी रुपयांचा निधी देण्याची घोषणा यापूर्वीच करण्यात आली आहे.
कल्याणपलिकडे वाहतूक सुरळीत..
बदलापूर शहरातही एकमेव उड्डाणपुलावर वाहतुकीचा भार आहे. बेलवली भागात एक भुयारी मार्ग असला तरी त्यातून लहान वाहनांची वाहतूक होते. त्यामुळे येथेही नव्या उड्डाणपुलाला मंजुरी दिली आहे. बेलवली भागात हा उड्डाणपूल प्रस्तावित आहे.