वाढत्या तापमानामुळे मागणीत घट; नासाडीच्या भीतीने पुरवठादारांकडून कमी दरात विक्री

ठाणे : वाढत्या उष्णतेमुळे मागणी घटल्याने गेल्या आठवडय़ापासून अंडय़ांच्या दरांमध्ये ५० पैसे ते एक रुपयाची घट झाली आहे. फेब्रुवारीच्या सुरुवातीला थंडीमुळे अंडय़ांना असलेली मागणी वाढली होती. त्यामुळे दरात एक रुपयाची वाढ झाली होती. आता मात्र अंडय़ांचे दर चार रुपयांवर स्थिरावले असून पुढील दोन महिने तरी हीच स्थिती कायम राहील, असे विक्रेत्यांचे म्हणणे आहे.

दरवर्षी उन्हाचा पारा चढू लागला की, अंडय़ांची मागणी कमी होते. अंडी उष्ण आणि पचनास जड असल्याचे मानले जाते. त्यामुळे उन्हाळ्यात अनेक जण अंडय़ाचे सेवन टाळतात. गेल्या काही दिवसांपासून पारा चाळिशीच्या आसपास असल्यामुळे ग्राहकांनी अंडी खरेदी करणे कमी केले आहे. ठाणे शहराला दररोज २२ ते २३ लाख अंडय़ांचा पुरवठा होतो. ही सर्व अंडी हैदराबाद आणि आंध्र प्रदेशहून विक्रीसाठी आणली जातात. सध्या या दोन्ही राज्यांतील पारा चढला आहे. हिवाळ्यात १५ ते १७ दिवस टिकणारी अंडी उन्हाळ्यात अवघ्या ४ ते ५ दिवसांत खराब होतात. त्यामुळे अंडी लवकर विकली जावीत यासाठी उन्हाळ्यात त्यांचे दर कमी केले जात असल्याचे पुरवठादारांकडून सांगण्यात आले.

घटलेली मागणी आणि वाढत्या उष्णतेमुळे पुरवठादारांनी कमी केलेले दर या दोन प्रमुख कारणांमुळे अंडय़ांचे दर कमी झाले आहेत. फेब्रुवारीत साडेपाच रुपये प्रति नग असलेले अंडे आता ४ रुपयांना मिळत आहे. दर कमी झाल्याने आणि मागणी घटल्याने त्याचा फटका अंडी विक्रेते आणि पुरवठादारांना बसत असल्याचे सगुना चिकनच्या विक्री आणि विपणन विभागाचे हरीश कुमार यांनी सांगितले.

जूनमध्ये पुन्हा भाववाढ

मे महिनाभर अंडय़ांचे दर कमी राहतील आणि जूनमध्ये पाऊस सुरू झाल्यावर दरांत वाढ होईल, असे पुरवठादारांनी सांगितले. अंडी खरेदी केल्यानंतर ती टिकवून ठेवण्यासाठी ग्राहक विविध उपाय करतात. मात्र, त्यामुळे अंडय़ाचा दर्जा खालावतो, असे काही अंडी विक्रेत्यांनी सांगितले.

Story img Loader