ठाणे : भिवंडी शहरात बांगलादेशींचे प्रमाण अधिक असून त्यांचा शोध घेण्यास पोलिसांनी सुरूवात केली आहे. रविवारी दहशतवादी विरोधी पथक आणि ठाणे गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने आठ बांगलादेशींना ताब्यात घेऊन अटक केली. अटकेत असलेल्या बांगलादेशींमध्ये एका महिलेचा सामावेश आहे. त्यांच्याविरोधात कोनगाव आणि नारपोली पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. भिवंडीतील ग्रामीण भागात झालेल्या कारवाईमुळे बांगलादेशी ग्रामीण भागातही वास्तव्य करत असल्याचे समोर येत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

भिवंडी येथील काल्हेर, पूर्णा, केवणी दिवा या गावात बांगलादेशी वास्तव्यास असल्याची माहिती दहशतवादी विरोधी पथकाच्या मुंबई युनीटला मिळाली होती. या माहितीच्या आधारे, पथकाने सुबुज शेख (३०), हैदर शेख (४२), जमाल शेख (४२) आणि मोहम्मद मोरशेद शेख (२६) यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे कोणतीही वैध कागदपत्र आढळून आली नाहीत. या भागात वास्तव्य करून ते गवंडी काम आणि नळ दुरुस्तीची कामे करत होते. त्यांच्याविरोधात नारपोली पोलीस ठाण्यात दहशदवादी विरोधी पथकाने तक्रार दाखल केल्याने गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणात चौघांना अटक झाली आहे.

हेही वाचा…कल्याण न्यायालयात आरोपीने, न्यायाधिशांचे दिशेने चप्पल भिरकावली

तर दुसरे प्रकरण कोनगाव भागातील आहे. कोनगाव येथे बांगलादेशी वास्तव्यास असल्याची माहिती ठाणे गुन्हे अन्वेषण शाखेच्या भिवंडी युनीटला मिळाली होती. या माहितीनुसार, पथकाने या भागातून रफिक शेख (४१), महमूदूल शेख (२२), अन्सार चौधरी (३५) आणि एका ३३ वर्षीय महिलेला ताब्यात घेतले. यातील महिला वगळता इतर तिघे भंगार विक्रीचा व्यवसाय करत होते. त्यांच्याकडे चौकशी केली असता, त्यांच्याकडे अवैध मार्गाने भारतात प्रवेश केल्याची कबूली दिली. याप्रकरणी त्यांच्याविरोधात कोनगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पोलिसांनी त्यांना अटक केली आहे.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Eight bangladeshis detained and arrested by anti terrorist squad and thane crime investigation branch on sunday sud 02