ठाणे : कळवा-मुंब्रा परिसरातील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या आठ माजी नगरसेवकांसह अनेक पदाधिकाऱ्यांनी मंगळवारी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षात जाहीर प्रवेश केला असून त्यापैकी अनेक पदाधिकाऱ्यांची विविध पदांवर नेमणुका करण्यात आल्या आहेत. यानिमित्ताने अजित पवार गटाने जितेंद्र आव्हाड यांना धक्का दिला असून त्याचबरोबर विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर पक्ष प्रवेशांची मालिका सुुरू झाल्याचे चित्र आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

राष्ट्रवादीच्या फुटीनंतर शरद पवार गट विरुद्ध अजित पवार गट असा सामना रंगला आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांचे समर्थक असलेले आनंद परांजपे आणि नजीब मुल्ला यांनी अजित पवार यांची साथ दिली आहे. जितेंद्र आव्हाड यांचा बालेकिल्ला असलेल्या कळवा-मुंब्रा विधानसभा मतदार संघातून निवडणुक लढविण्याची तयारी अजित पवार गटाकडून सूरू असून यातूनच दोन्ही गटात राजकीय चढाओढ लागली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कळवा-मुंब्रा मतदार संघाकरिता निधी देऊन आव्हाड यांना शह देण्याचा प्रयत्न केला होता. त्यापाठोपाठ आनंद परांजपे आणि नजीब मुल्ला यांनी आव्हाड समर्थक असलेले आठ माजी नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांना पक्षात घेऊन आव्हाड यांना धक्का दिला आहे.

हेही वाचा >>> डोंबिवलीतील फडके रोडला झाडाच्या फांद्यांचा अडथळा; वाहतूक कोंडी, वीज पुरवठा खंडित

अजित पवार यांच्या मुंबईतील देवगिरी या निवासस्थानी मंगळवारी रात्री हा पक्ष प्रवेशाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी कळव्यातील माजी विरोधी पक्षनेते प्रकाश बर्डे, नगरसेविका रिटा यादव, परिवहन समिती सदस्य तकी चेऊलकर, समाजसेवक राजनाथ यादव आणि मुंब्र्यातील नगरसेविका रुपाली गोटे, नगरसेविका आशरीन राऊत, समाजसेवक इब्राहिम राऊत, नगरसेवक शेख जफर नोमानी, नगरसेविका हफिजा नाईक, समाजसेविका नेहा नाईक, समाजसेवक काफील शेख, नगरसेविका अन्सारी साजिया परवीन सर्फराज, समाजसेवक राजू अन्सारी, समाजसेवक सर्फराज अन्सारी, नगरसेविका हसीना अब्दुल अजीज शेख, समाजसेवक अजीज शेख, मुमताज शाह, मेहफूज (मामा) शेख, सय्यद शमविल यांनी पक्ष प्रवेश केला.

शेख जाफर नोमानी यांची मुंब्रा-कळवा विधानसभा अध्यक्ष पदी, मुमताज शाह यांची जिल्हा सरचिटणीस, मुंब्रा-कळवा प्रवक्ते पदी, मेहफूज (मामा) शेख यांची शीळ डायघर ब्लॉक अध्यक्ष पदी, सय्यद शमवील याची राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या मुंब्रा-कळवा विधानसभा अध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Eight ex corporators of nationalist sharad chandra pawar party in kalwa mumbaira join ajit pawar group amy