ठाणे : ठाणे शहरात समुह पुनर्विकास योजनेचे काम वेगाने सुरू आहे. शहरात रस्ते प्रकल्प, भुयारी मार्ग, कोस्टल रोड, अंतर्गत मेट्रो प्रकल्प आणि मेट्रो असे प्रकल्प राबविले जात आहेत. यामुळे शहराचा सर्वांगीण विकास होत असून प्रत्येकाला वाटते की, ठाण्यात आता घर असावे, असे सांगत येत्या काही वर्षात ठाणे शहराला प्रथम क्रमांकाचे शहर बनवायचे असल्याचे मत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुक्रवारी व्यक्त केले. ठाणे शहरातील क्लस्टर योजनेत आणि सौदर्यीकरणाच्या कामात विकासकांनी सहभाग घ्यावा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
ठाण्यातील ढोकाळी येथील हायलँड गार्डन मैदानावर एमसीएचआय या ठाण्यातील बांधकाम व्यावसायिकांच्या संघटनेने भरविलेल्या मालमत्ता प्रदर्शनाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भेट देऊन उपस्थितांशी संवाद साधला. ठाणे शहराला तलावांचे शहर म्हणून ओळखले जाते. हि ओळख टिकविण्यासाठी तलावांच्या परिसराचे सौदर्यीकरण केले जात आहे. ठाण्यातील येऊर भागात संजय गांधी राष्ट्रीय उद्यान आहे. शहरात मोठ्या प्रमाणात हरित क्षेत्र आहे. ग्लबोल वार्मिंगचा धोका लक्षात घेऊन निसर्गाची काळजी घेऊन विकास केला जात आहे. ग्लोबल वाॅर्मिंगचा धोका टाळण्यासाठी झाडांची लागवड केली पाहिजे, असे शिंदे म्हणाले. पुर्वीचे ठाणे आणि आता ठाणे यात खूप बदल झाला आहे. शहराचा सर्वांगीण विकास होत असून प्रत्येकाला वाटते की, ठाण्यात आता घर असावे, असेही ते म्हणाले.
एकत्रिकृत विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावली (युनिफाईड डीसीआर ) च्या माध्यमातून विकासकांनाही फायदा झालेला आहे. त्यामुळे आता विकासकांनाही आता ग्राहकांचा विचार केला पाहिजे. ठाण्यात क्लस्टरचे पाच ठिकाणी वेगाने काम सुरु असून त्यात विविध शासकीय संस्था सहभागी झाल्या आहेत. ठाण्यातील विकासकांनीही या योजनेत सहभागी व्हावे. सरकार हे सर्वसामान्यांसाठी असते. विकासकही सर्वसामान्यांसाठी घरे बांधत असतो. त्यामुळे त्यांच्याही समस्या जाणून घ्यायला हव्यात. माझ्याकडे नगरविकास आणि गृहनिर्माण खाते आहे, त्यामुळे तुम्ही चिंता करु नका. परंतु ग्राहकाला चांगला फायदा द्या, असेही ते म्हणाले.