Ladki Bahin Yojana : स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधत बदलापुरात पालिकेच्या प्रशासकीय इमारतीच्या लोकार्पणाप्रसंगी आलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे शिवसेनेच्या वतीने आभार मानण्यात आले. मात्र त्याच कार्यक्रमात सहभागी असलेल्या राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या अजीत पवार गटाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री जाताच शहराच्या आपल्या मुख्यालयासमोर शक्तिप्रदर्शन करत उपमुख्यमंत्री अजीत पवार यांचे आभार मानत जल्लोष केला. त्यामुळे सत्ताधारी पक्षांमध्येच शहरात स्पर्धा सुरू असल्याचे चित्र दिसून आले.

कुळगाव बदलापूर नगर परिषदेच्या भव्य नव्या प्रशासकीय इमारतीचे लोकार्पण गुरुवारी स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी लाडकी बहीण योजनेंतर्गत खात्यावर ३ हजार रुपये जमा झालेल्या लक्ष्मी या महिलेने एकनाथ शिंदे यांना राखी बांधून त्यांचे आभार मानले. या कार्यक्रमात लाडकी बहीण योजनेचे श्रेय शिवसेनेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना देण्याचा प्रयत्न केला. याच कार्यक्रमात महायुतीचे घटक असलेल्या राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या अजीत पवार गटाचे पदाधिकारीही उपस्थित होते. मात्र त्यानंतर सायंकाळी राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस आशिष दामले यांच्या जनसंपर्क कार्यालयाबाहेर लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांनी जल्लोष करीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आभार मानले. यावेळी फटाक्यांची आतषबाजी करीत अजित पवार यांचे छायाचित्र आणि झेंडे झळकवण्यात आले. तसेच जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली.

हेही वाचा – कल्याण : शिवसेनेच्या सोमवारच्या कार्यक्रमासाठी वर्दळीच्या शिवाजी चौकात मोठ्ठा मंडप, नागरिकांची नाराजी

हेही वाचा – जुनी डोंबिवलीत वाढदिवसासाठी गेलेल्या अल्पवयीन मुलीचे अज्ञाताकडून अपहरण

राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या महिला कार्यकर्त्यांनी महिलांनी फेर धरून, फुगड्या खेळून एकमेकींना पेढे भरवत आनंदोत्सवही साजरा केला. आशिष दामले यांनीही यावेळी उपस्थित राहून महिलांना शुभेच्छा दिल्या. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या संकल्पनेतून राज्यात सुरू असलेली माझी लाडकी बहीण योजनेचा थेट लाभ हस्तांतरण करण्यास बुधवारपासून सुरुवात झाली आहे. बदलापूरमध्ये देखील माझ्या संपर्क कार्यालयातून विक्रमी नोंदणी झाली आहे. या योजनेचा लाभ मिळालेल्या बदलापूरमधल्या महिलांनी अचानक माझ्या संपर्क कार्यालयात येऊन हा आनंद साजरा केला, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेश सरचिटणीस आशिष दामले यांनी दिली. मात्र या एकाच दिवसातल्या दोन घटनांमुळे शहरात महायुतीच्या दोन पक्षांमध्ये श्रेयावरून स्पर्धा सुरू असल्याची चर्चा रंगली होती.

Story img Loader