ठाणे : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविरोधात दोनदा विधानसभे ची निवडणुक लढविणारे आणि त्यांचे कडवे विरोध म्हणून ओळख असलेले मनोज शिंदे यांनी काही महिन्यांपुर्वी काँग्रेसला रामराम ठोकत शिंदेच्या शिवसेनेत जाहीर प्रवेश केला होता. तेव्हा त्यांच्याकडे पक्षाची कोणतीही जबाबदारी देण्यात आलेली नव्हती. यामुळे त्यांच्याकडे कोणती जबाबदारी दिली जाणार, याकडे पक्ष कार्यकर्त्यांचे लक्ष लागले होते.

दरम्यान, शुक्रवारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनोज शिंदे यांची ठाणे लोकसभा संपर्कप्रमुखपदी नियुक्तीची घोषणा करत त्यांना तसे पत्र दिले. यामुळे एकेकाळच्या कडव्या विरोधकाच्या हाती एकनाथ शिंदे यांनी ठाण्याची सुत्रे दिल्याची चर्चा रंगली आहे. कोपरी-पाचपखाडी हा मतदार संघातून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे निवडुण येतात. याच मतदार संघातून उपमुख्यमंत्री शिंदे यांच्याविरोधात मनोज शिंदे यांनी दोनदा विधानसभेची निवडणुक लढविली होती. त्यात त्यांचा पराभव झाला होता.

एकेकाळी एकनाथ शिंदे यांचे कडवे विरोधक म्हणून मनोज शिंदे ओळखले जात होते. मात्र, काँग्रेसला रामराम ठोकत मनोज शिंदे यांनी काही महिन्यांपुर्वी शिंदेच्या शिवसेनेत जाहीर प्रवेश केला आणि तेव्हापासून त्यांची उपमुख्यमंत्री शिंदे यांचे विरोधक नव्हे तर जवळचे समर्थक म्हणून ओळखले जाऊ लागले आहेत. श्रीनगर भागातील एकेकाळचे काँग्रेसचे प्रभावी नेते मनोज शिंदे यांना पक्षात आणून उपमुख्यमंत्री शिंदे यांनी एक कडवा विरोधक संपविल्याची चर्चा आहे.

मनोज शिंदे यांनी शिवसेनेत केलेल्या पक्ष प्रवेशानंतर त्यांच्याकडे पक्षाची कोणतीही जबाबदारी देण्यात आलेली नव्हती. असे असले तरी त्यांनी पक्ष वाढीचे काम सुरू केले होते. माजी महापौर अशोक वैती यांच्यासमवेत मनोज शिंदे यंनी शहरात जनसंवाद हा उपक्रम राबविण्यास सुरूवात केली आणि यामध्ये दर मंगळवारी ते शहरातील नागरिकांच्या तक्रारी ऐकून त्या सोडविण्याचे काम करीत आहेत. मनोज शिंदे यांच्याकडे पक्षाची कोणती जबाबदारी दिली जाणार, याकडे पक्ष कार्यकर्त्यांचे लक्ष लागले होते.

दरम्यान, शुक्रवारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनोज शिंदे यांची ठाणे लोकसभा संपर्कप्रमुखपदी नियुक्तीची घोषणा करत त्यांना तसे पत्र दिले. मनोज शिंदे यांची ठाणे लोकसभा संपर्कप्रमुखपदी एक वर्षासाठी नियुक्ती करण्यात आली आहे. शिवसेना सचिव संजय मोरे यांनी, प्रत्येक महिन्यात किमान दोन संपर्क दौरे करण्याच्या सुचना दिल्या असून या संपर्क दौऱ्याचा दरमहा अहवाल शिवसेनेच्या बाळासाहेब भवन येथे देण्यात यावा. अशी सूचनाही संजय मोरे यांनी मनोज शिंदे यांना केली आहे.

चौकट हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा हिंदुत्वाचा विचार आणि धर्मवीर आनंद दिघे यांची शिकवण याचा सक्रीयपणे प्रचार आणि प्रसार करणार असून शिवसेना पक्ष वाढीसाठी सर्वांना सोबत घेऊन कार्य करणार असलाचा विश्वास मनोज शिंदे यांनी व्यक्त केला आहे. पक्षाने सोपवलेल्या या नविन जबाबदारीचे निष्ठेने योग्य तऱ्हेने पालन करण्याचा निर्धारही त्यांनी व्यक्त केला आहे.