राजमाता, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी समाजाभिमुख राज्यकारभार करून आपल्या राज्यातील जनतेला सुखी आणि समाधानी ठेवण्याचा प्रयत्न केला. त्यांचा राज्यकारभार आम्हा राज्यकर्त्यांना नक्कीच मार्गदर्शक ठरेल, असे प्रतिपादन पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी येथे केले.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी प्रतिष्ठान डोंबिवली यांच्या वतीने अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय कीर्तन महोत्सव व पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. ३० एप्रिल ते ४ मे या कालावधीत पाथर्ली येथील पोटेश्वर मैदानात हा सोहळा पार पडला. या वेळी पालकमंत्री शिंदे यांनी वरील प्रतिपादन केले. शिंदे यांच्या हस्ते सामाजिक कार्यकर्त्यां संगीता ढोके यांना अहिल्यादेवी जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. तर ह.भ.प. निवृत्ती महाराज हुले यांना वारकरीभूषण पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. याप्रसंगी आमदार रवींद्र चव्हाण, माजी महापौर वैजयंती गुजर घोलप, गंगाराम शेलार, महेश पाटील, नानासाहेब दोलताडे आदी मान्यवर उपस्थित होते.
शिंदे पुढे म्हणाले, प्रतिष्ठानचे अध्यक्ष नानासाहेब दोलताडे यांनी अध्यात्म आणि इतिहासाचा सुरेख संगम या सोहळ्याच्या माध्यमातून साधला आहे. अहिल्यादेवी होळकर यांचे सामाजिक, राजकीय कार्य लोकांसमोर मांडत असतानाच वारकरी संतांच्या पुरोगामी विचारांच्या माध्यमातून सामाजिक प्रबोधन करण्याचा उपक्रमही कौतुकास्पद आहे. आज तरुण पिढी भौतिक सुखामागे धावत असताना वारकरी संतांचे विचारच माणसाला खऱ्या मार्गापर्यंत घेऊन जातील, असा विश्वासही त्यांनी या वेळी व्यक्त केला.
गांजलेल्यांना न्यायाची गरज
संगीता ढोके यांनी सत्काराला उत्तर देताना सांगितले, अहिल्याबाई यांनी ज्या पद्धतीने समाजातील रंजल्या-गांजलेल्यांना न्याय देण्याचे प्रयत्न केला, त्याच पद्धतीने काम करण्याची गरज आहे. त्यांच्या कार्याचा वारसा पुढे नेण्यासाठी प्रतिष्ठानच्या वतीने प्रयत्न केले जात आहेत. त्यांचे कार्य कौतुकास्पद आहे. या वेळी धनगर समाजातील गुणवंतांचा विशेष सत्कार करण्यात आला. कीर्तन महोत्सवात बाबासाहेब महाराज इंगळे, जगन्नाथ पाटील, विष्णू गोंडे आणि शामसुंदर सोन्नर यांची कीर्तने झाली. गोरक्षनाथ क्षीरसागर यांनीकीर्तनाचे संगीत संयोजन केले. प्रतिष्ठानचे अध्यक्ष नानासाहेब दोलतोडे यांनी आभार मानले.