अंबरनाथः विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अंबरनाथमध्ये शिवसेनेचे विद्यमान आमदार डॉ. बालाजी किणीकर आणि स्थानिक माजी नगराध्यक्ष अरविंद वाळेकर यांच्यातील वादावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी नुकताच पडदा टाकला. त्यानंतर डॉ. किणीकर यांनी वाळेकरांचे वर्चस्व असलेल्या शिवसेना शहर शाखेत जाऊन गेल्या चुकांबद्दल कार्यकर्त्यांकडे दिलगिरी व्यक्त केली. अवघ्या काही मिनिटांच्या संवादात डॉ. किणीकर यांनी तीनदा दिलगिरी व्यक्त केली. तसेच यापुढे स्थानिक पातळीवर अरविंद वाळेकरांच्याच नेतृत्वाखाली पक्षाचे काम करण्याचेही कबूल केले. ही दिलगिरी आणि कबुलीनामा शाखेत पदाधिकाऱ्यांसमोर होता. मात्र तो समाज माध्यमांवर प्रसारीत झाल्याने अनेक चर्चाही रंगल्या आहेत.

अंबरनाथ विधानसभा मतदारसंघात गेल्या काळात शिवसेनेचे आमदार डॉ. बालाजी किणीकर आणि पक्षाचेच माजी शहरप्रमुख तथा नगराध्यक्ष अरविंद वाळेकर यांच्यात उघड संघर्ष सुरू होता. दोघेही एकमेकांवर उघड टीका करत होते. तर दोन्ही गटांचे कार्यकर्तेही एकमेकांवर हल्ला चढवण्यात मागे नव्हते. विधानसभा निवडणुकीत आमदार डॉ. किणीकरांना या संघर्षचा फटका बसण्याची भीती होती. अरविंद वाळेकर यांची शहरात मोठी ताकद आहे. त्यामुळे हा वाद मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या दरबारी सोडवण्यात आला. यावेळी शिंदे यांनी दोन्ही गटांना समज दिली. त्यानंतर आमदार डॉ. बालाजी किणीकर यांनी अरविंद वाळेकरांचे वर्चस्व असलेल्या शिवसेनेच्या शहर शाखेत जाऊन वाळेकर समर्थक शिवसैनिकांशी संवाद साधला. हा संवाद मर्यादीत पदाधिकाऱ्यांसाठी होता. मात्र याची चित्रफित दुसऱ्याच दिवशी समाज माध्यमांवर प्रसारीत झाली. या चित्रफितीत डॉ. बालाजी किणीकर यांनी वाळेकर समर्थकांपुढे विजयासाठी लोटांगण घातल्याचे दिसून आले. यावेळी बोलताना डॉ. किणीकर यांच्याशेजारी बदलापूर शहरप्रमुख वामन म्हात्रे, उल्हासनगरचे महानगरप्रमुख राजेंद्र चौधरी तर मागे अरविंद वाळेकर उभे दिसत आहेत. यात बोलताना किणीकर यांनी, ‘माझ्याकडून चुका झालेल्या असतील. गोष्टी विभागल्याने काही गैरसमज झाले असतील पण पुन्हा ते होणार नाहीत. कुणाला काही वाईट वाटले असेल तर त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो’, असे सांगत डॉ. किणीकर यांनी आपल्याच पक्षाच्या पदाधिकाऱ्यांसमोर लोटांगण घातल्याचे चित्र दिसले.

हेही वाचा – ठाणे : दिवाळीनिमित्त बाजारात खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी, खरेदीमुळे शहराच्या मध्यवर्ती भागात वाहतूक कोंडी

तसेच, ‘राज्याचे मुख्यमंत्री, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, गोपाळ लांडगे, अरविंद वाळेकर यांच्या नेतृत्वाखाली यापूर्वी काम करत आलो, पुढेही करणार’, असे किणीकर म्हणाले. ‘काही गैरसमज, काही चुका झाल्या पण परत होणार नाहीत. काही वाईट वाटले असेल, दाखल केलेल्या गुन्ह्यांबाबत वाईट वाटत असेल तर त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. सर्वांच्या नेतृत्वाखाली काम करणार’, असेही किणीकर बोलताना दिसत आहेत.

हेही वाचा – ठाणे, पालघरमध्ये शिंदे यांची भिस्त आयात उमेदवारांवर ?

‘मुख्यमंत्री शिंदे साहेबांनी सांगितल्याप्रमाणे अरविंद वाळेकर यांना फोन करणार. पालिका निवडणुकीत अरविंद वाळेकरांच्याच नेतृत्वाखाली लढणार’, असेही किणीकर म्हणाले. ‘२००९, २०१४, २०१९ या निवडणुकांमध्ये वाळेकरांमुळेच आमदार झालो. मी कुणालाही कधीही अपमानीत केले नाही, अपमान होईल असे बोललो नाही, तरीही दिलगिरी व्यक्त करतो. त्यामुळे यापूर्वीच्या निवडणुकांप्रमाणेच पुन्हा निवडून द्या’, असे आवाहन किणीकर यावेळी बोलताना केल्याचे दिसते आहे. त्यामुळे या मनोमीलनानंतर आता अंबरनाथमध्ये शिवसेना एकत्र काम करणार का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.