ठाणे : ‘हम अंग्रेज के जमाने के जेलर है…’,‘आधे इधर जाओ, आधे उधर जाओ, बाकी मेरे पीछे आओ’ हा ‘शोले’ चित्रपटातील संवाद सांगत पीछे कोई नही, असे म्हणत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाकरे गटाला टोला लगावला. माझ्या रेषा कमी करण्यापेक्षा स्वत:च्या रेषा वाढवा आणि लोक सोडू का जाताहेत याचे आत्म परिक्षण करा, असा सल्लाही त्यांनी यावेळी ठाकरे गटाच्या नेत्यांना दिला. ज्या पक्षाच्या विचारांना वाळवी लागली आहे, तिथे कसा राहील राजन साळवी अशी टिकाही त्यांनी केली.
ठाकरे गटाचे माजी आमदार राजन साळवी यांनी गुरूवारी ठाण्यातील टेंभीनाका येथील आनंदाश्रमात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. त्यावेळी शिंदे यांनी बोलताना ठाकरे गटाला टोले लगावले. महाविकास आघाडीने बंद पाडलेले प्रकल्प आम्ही सुरू केले. या प्रकल्पांना पुढे नेत चालना दिली. लोकाभिमुख लोककल्याणकारी अशा लाकडी बहिण, शेतकरी, भाऊ अशा योजना आणल्या. गेल्या अडीच वर्षात केलेल्या कामांमुळेच आज अनेक लोक शिवसेनेत सामील होत आहेत. मंत्री उदय सामंत आणि किरण सामंत यांनी मला सांगितले की, पक्ष मोठा होत असेल तर, प्रत्येकाला आपण आपल्या पक्षांमध्ये सामील करून घेतले पाहिजे. तसेच पक्ष मोठा झाला, पक्ष वाढला तरच आमची किंमत आहे आणि म्हणून राजन साळवी आपण देर आये दुरुस्त आये, असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. ‘सुबह का भुला यादी शाम को घर आ जाये तो उसे भुला नही कहते’, याचप्रमाणे राजन साळवी हे आमच्याच परिवारातले आहेत. त्यामुळे खऱ्या शिवसेनेत साळवी हे सामील झाल्याचा आनंद आहे, असेही शिंदे म्हणाले. कोणतीही अट न ठेवता शिवसेनेचे काम करायचे, एवढीच भावना साळवी यांनी बोलून दाखवली. पण, या पक्षामध्ये जो काम करेल, तो पुढे जाईल, असेही शिंदे म्हणाले. ज्या पक्षाच्या विचारांना वाळवी लागली आहे, तिथे कसा राहील राजन साळवी अशी टिकाही त्यांनी केली.
दिल्लीमध्ये महापराक्रमी महादजी शिंदे राष्ट्र गौरव हा पुरस्कार मला शरद पवार यांच्या हस्ते मिळाला. तिथे महादजी शिंदे यांचे वंशज केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे हे उपस्थित होते. एका मराठी माणसाला मराठी माणसाने पुरस्कार दिला, याचा अभिमान झाला पाहिजे होता. पण, किती जळणार, किती जळफळ होणार, किती शिव्याशाप देणार. तुम्ही माझी रेष कापण्यापेक्षा तुमची रेष वाढवा आणि त्यासाठी लोकांमध्ये जा. कारण घरी बसलेल्या लोकांना लोक स्वीकारत नाहीत हे विधानसभेच्या निवडणुकीने दाखवून दिले. माझी रेष ही जनसेवेची आहे, असा टोला शिंदे यांनी लगावला.