ठाणे : महाविकास आघाडीचा घटक पक्ष असलेल्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या नेत्यांनी आगामी महापालिका निवडणुका स्वबळावर लढण्याचा नारा दिला असून याच मुद्द्यावरून आता शिवसेना (शिंदे गट) नेत्यांनी ठाकरे गटावर टिकेचे बाण सोडले आहेत. स्वबळावर निवडणुक लढणार असल्याचे सांगत काँग्रेसला शिव्या देणे सुरू केले असून सरड्याप्रमाणे रंग बदलण्याचे काम उबाठाने सुरू केले आहे. तसेच स्वबळावर लढले तर, दोन अंकी आकडा एक अंकावर येईल, अशी टिप्पणीही शिंदे गटाच्या नेत्यांनी केली आहे.

मुंबईपासून ते नागपूरपर्यंत सर्व महापालिकेच्या निवडणुका आम्ही स्वबळावर लढवणार आहोत, अशी घोषणा शिवसेना (ठाकरे गट) नेते संजय राऊत यांनी केली आहे. या घोषणामुळे महाविकास आघाडीत फूट पडणार असल्याचे चित्र आहे. असे असतानाच, ठाकरे गटाचे नेते राऊत यांनी जाहीर केलेल्या भुमिकेवरून विरोधी पक्षाने ठाकरे गटावर टिका करण्यास सुरूवात केली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यापुर्वीच महायुतीमध्ये निवडणुका लढविणार असल्याची भुमिका स्पष्ट केली आहे. त्यामुळे महापालिका निवडणुका महायुतीतच लढल्या जातील, ही काळ्या दगडावरची भगवी रेघ आहे, असे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी स्पष्ट केले. तसेच उबाठाने स्वबळावर निवडणुक लढविली तर, त्यांचा दोन आकडी अंक एकवर आल्याशिवाय राहणार नाही, असा टोलाही त्यांनी लगावला.

हेही वाचा – काळ्या जादूचा नाश करण्यासाठी बाबा आणणार होता मृतदेह, मृतदेह आणण्यासाठी बाबाने घेतले ८ लाख ८७ हजार रुपये

महापालिकांच्या निवडणुका होणार आहेत आणि उबाठा महापालिकेच्या सत्तेशिवाय जगू शकत नाही हे पुन्हा एकदा सिद्ध होत आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक होत आहे, याची आठवण त्यांना मुंबई महापालिका निवडणुकीच्या धर्तीवर झाली आहे. यामुळेच उद्धव ठाकरे हे सर्व नेते घेऊन पाहणी करण्याकरीता गेले होते. आधी नाक घासून बाळासाहेबांची माफी मागा आणि मगच स्मारकामध्ये पाऊल ठेवा. कारण तुम्ही माती खाल्ली सत्तेच्या लोभापाई, अशी टिका शिवसेना (शिंदे गट) खासदार नरेश म्हस्के यांनी केली. सत्तेच्या खुर्चीसाठी काँग्रेसच्या दारी गेले. सोनिया गांधी यांच्या उंबरठ्यावर जाऊन बसले. वीर सावरकर यांच्या अपमान करणाऱ्या राहुल गांधी यांना मिठ्या मारत होते. आता त्यांनीच स्वबळावर निवडणुक लढणार असल्याचे सांगत काँग्रेसला शिव्या देणे सुरू केले असून सरड्याप्रमाणे रंग बदलण्याचे काम उबाठाने सुरू केले आहे, असा टोलाही त्यांनी लगावला.

हेही वाचा – एसटी कर्मचाऱ्यांसाठी उभारणार कॅशलेस रुग्णालय, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा

राजकारणात कोणी शत्रू आणि मित्र नसतो

राजकारणामध्ये कोणीही कोणाचा कायमचा शत्रू नसतो आणि कुणी कुणाचा मित्र नसतो. यामुळेच गेल्या अडिच वर्षात आपण पाहिले की कधी महाविकास आघाडी सत्तेवर आले तर कधी महायुतीचे सरकार सत्तेवर आले. ठाण्यात एक परंपरा राहिली आहे. आनंद दिघे आणि वसंत डावखरे या दोन्ही नेत्यांचे अनुयायी म्हणून आम्ही काम करत आलो आहोत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, आमदार संजय केळकर, जितेंद्र आव्हाड, खासदार नरेश म्हस्के, रविंद्र फाटक, निरंजन डावखरे आणि मी अशा आम्ही आठ ते दहा प्रमुख नेत्यांनी राजकारण कधी केले नाही. कारण राजकारण हे राजकारणाच्या ठिकाणी असायला हवे. त्यामुळेच जेव्हा वेळ येते तेव्हा आम्ही सर्व नेते शहरासाठी एकत्र येतो, असे मत परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी व्यक्त केले.

Story img Loader