ठाणे : ठाण्याने सुसंस्कृत नेतृत्व दिलेले आहेत.  त्यात खंडू रांगणेकर, प्रभाकर हेगडे, पाटील यांच्या नावाचा उल्लेख होतो. ही सर्व मंडळी समाजातील एक विशिष्ट विचारधारा घेऊन एक विशिष्ट दर्जांनी समाजकारण, राजकारण करीत होती. हीच ठाण्याची ओळख होती. हळूहळू तशीच स्थिती इथे होईल, यासाठी ठाणेकर काळजी घेतली आणि महाराष्ट्र मुक्त होईल, असा टोला राष्ट्रवादीचे पक्ष अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नाव न घेता त्यांना लगावला आहे. त्यास शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी प्रतिउत्तर देत गुंड दाऊद इब्राहिम याच्याशी घनिष्ठ संबंध ठेवणे आणि त्या आरोपाखाली जेलमध्ये जाणे हे त्यांच्या लेखी सुसंस्कृत पणाचे लक्षण असेल, असा टोला लगावला आहे. तसेच महाराष्ट्राच्या राजकारणाला , समाजकारणाला आणि सत्तेला जो काही लोकांनी काळीमा लावण्याचे काम केले होते, ते पुसण्याचे काम ठाण्यातील सुसंस्कृत नेत्याने केले आहे, याचा आम्हाला अभिमान असल्याचे त्यांनी म्हटले आहे. शरद पवार हे देशाचे नेते आहेत. आज या वयात ते ज्या तडफेने काम करतात, ते बघून आमच्यासारख्या तरूणांनाही प्रेरणा मिळते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> Thackeray vs Shinde in SC: शिंदे गटाच्या ‘पाच वर्ष निकाल लागणार नाही’ या दाव्यावर शरद पवारांची प्रतिक्रिया; म्हणाले, “याचा अर्थ…”

आज त्यांनी राजकारणात सुसंस्कृत नेतृत्वाचा दाखला देताना ठाणे जिल्ह्यातील काही नेत्यांचा उल्लेख केला. ठाण्याने नेहमीच सुसंस्कृत नेतुत्व दिले आहे. परंतु, पवार यांनी बहुतेक सुसंस्कृत नेत्यांची व्याख्या आता बदललेली दिसते. कुख्यात गुंड दाऊद इब्राहिम याच्याशी घनिष्ठ संबंध ठेवणे आणि त्या आरोपाखाली जेलमध्ये जाणे हे त्यांच्या लेखी सुसंस्कृत पणाचे लक्षण असेल. गृहमंत्री पद मिळाल्यानंतर डान्स बार मालकांकडून खोक्याने पैसा गोळा करण्यात त्यांना सुसंस्कृतपणा दिसत असेल. त्यामुळे त्यांचा हा सुसंस्कृतपणा त्यांनाच लखलाभ असो, असे म्हस्के यांनी म्हटले आहे. ठाण्यातील जनता ही सुज्ञ आहे. त्यांनी ज्या नेत्यावर एवढी वर्षे विश्वास दाखवला तो नेताच आज राज्याचे नेतृत्व करत आहे.

हेही वाचा >>> “रोहित पवारांचं काय होणार? हे…” मोहित कंबोजांच्या आरोपांवर शरद पवारांची प्रतिक्रिया, म्हणाले…

सर्वसामान्य जनतेच्या सुख दुःखात समरसून जाणारा आमचा नेता केवळ सुसंस्कृतच नाही तर कर्तव्यदक्षही आहे. हातची सत्ता गेल्याने विरोधक कासावीस झालेले आहेत. त्यातच मुख्यमंत्र्यांनी ज्या पद्धतीने कामाचा झपाटा लावला आहे, हे बघून सत्तेची स्वप्नही त्यांना पडेनाशी झाली आहेत. त्या अस्वस्थेतेतून अशा प्रकारची विधाने त्यांच्याकडून येत आहेत, अशी टिकाही त्यांनी केली आहे.  ठाणेकर जनताच नव्हे तर राज्यातील जनता आमच्या सुसंस्कृत नेत्याचे हात भक्कम करतील याबाबत कुणीही चिंता करण्याची गरज नाही. महाराष्ट्राच्या राजकारणाला , समाजकारणाला आणि सत्तेला जो काही लोकांनी काळीमा लावण्याचे काम केले होते , ते पुसण्याचे काम ठाण्यातील सुसंस्कृत नेत्याने केले आहे याचा आम्हाला अभिमान असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Eknath shinde group response to sharad pawar remark zws