कल्याण डोंबिवली महानगरपालिकेची मुदत ही ऑक्टोबर २०२० मध्ये संपली आहे. तेव्हापासून प्रशासक म्हणून पालिका आयुक्तांमार्फत पालिकेचा कारभार सुरु आहे. असं असतांना तरी महानगरपालिकेच्या निवडणुकांबाबत लवकरच निर्णय होण्याची शक्यता आहे. तेव्हा कल्याण डोंबिवलीत सध्या महानगर पालिका निवडणुकांचे वारे वाहत आहेत. यामुळेच या भागातील प्रमुख राजकीय पक्ष असलेल्या शिवसेना आणि भाजपमध्ये आरोप प्रत्यारोपांचे सत्र सध्या जोरात सुरु आहे.
डोंबिवलीचे आमदार, भाजपाचे नेते रविंद्र चव्हाण यांनी ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री आणि नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार हल्ला चढवला आहे. मुंबईतील भाजप प्रदेश मुख्यालयात पत्रकार परिषदेच्या माध्यमातून चव्हाण यांनी शिंदे यांच्या कार्यपद्धतीवर टीका केली आहे.
“भाजपा सरकारमध्ये राज्यमंत्री असताना डोंबिवलीत दर्जेदार रस्ते व्हावेत यासाठी एमएमआरडीएच्या माध्यमातून ३४ रस्त्यांच्या कामासाठी ४७०.८२ कोटी रुपये मंजूर करुन घेतले. याचा पाठपुरावा सुरु असतांना आता या रस्त्यांची कामे रद्द करण्यात आली आहेत. ही कामे रद्द करण्याचे आदेश एकनाथ शिंदे यांनीच दिले आहेत,” असा आरोप रविंद्र चव्हाण यांनी आज केला.
“डोंबिवलीच्या विकासात खरा अडथळा निर्माण करण्याचं काम एकनाथ शिंदे यांच्या आदेशानेच होत आहे. राज्याच्या आणि देशाच्या निवडणुकांमध्ये युतीत इतके वर्ष लढूनही शिवसेनेचे ठाण्याचे नेतृत्व कल्याण डोंबिवलीत विकास कामामध्ये झारीतील शुक्राचार्याचे काम करत होते,” असा आरोपही आमदार चव्हाण यांनी केला आहे.
दरम्यान पत्रकार परिषद घेतल्यानंतर डोंबिवलीत भाजपाने शिवसेने विरोधात जोरदार बॅनरबाजी केली आहे.