पालकमंत्री एकनाथ शिंदे यांचे ‘एमएसआरडीसी’ला आदेश
कल्याण-शिळफाटा रस्त्यावरील वाहनांचा भार दुप्पट वाढला आहे. या रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा प्रत्येक मिनीट महत्त्वाचा असताना त्यांना येथील वाहतूक कोंडीत तासन् तास कोंडीत अडकावे लागते. पत्री पूल वाहतूक कोंडीचे नवीन दुखणे तयार झाले आहे. त्यामुळे नवीन पुलाचे काम येत्या आठ महिन्यांच्या आत पूर्ण करावे, असे आदेश सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ शिंदे यांनी रविवारी ‘एमएसआरडीसी’ला दिले.
शिळफाटा रस्त्यावरील पलावा चौक येथील उड्डाण पुलाची पायाभरणी, शिळफाटा-भिवंडी २१ किमी सहा पदरी रस्ता, नेतिवली येथील पत्री पुलाच्या रेल्वे मार्गावरील उड्डाण पुलाच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम शिंदे यांच्या हस्ते रविवारी पार पडला. या कार्यक्रमात ते बोलत होते. ‘एमएसआरडीसी’ने नेहमी पूल उभारणीची आव्हानात्मक कामे वेळेत पूर्ण केली. राज्याचे बांधकाममंत्री असताना नितीन गडकरी यांच्या काळात मुंबई-पुणे रस्ता, मुंबईत ५५ उड्डाण पूल उभे राहिले. नंतरच्या काळात ‘एमएसआरडीसी’ अज्ञातवासात गेली. या महामंडळास मुख्यमंत्री आणि आम्ही पुन्हा जिवंत करून अनेक रस्ते प्रकल्प हाती घेतले आहेत. ही कामे वेळेत पूर्ण करून लोकांना वेळेत उपलब्ध करून देणे हे आव्हान महामंडळापुढे आहे, असे शिंदे यांनी सांगितले.
विकास प्रकल्पांना स्थानिकांनी विरोध करून नये. विकासासाठी जमीन देणाऱ्यांना शासन त्यांचा आवश्यक मोबदला देण्यास बांधील आहे, असे शिंदे म्हणाले. येत्या काळातील वाढत्या वाहनसंख्येचा विचार करून अनेक पर्यायी रस्ते प्रकल्प हाती घेतले आहेत. खालापूर-सिंहगड बोगद्यामुळे पुण्याला जाण्याचे अंतर १० किलोमीटरने कमी होऊन हा प्रवास मिनिटात होणार आहे. नागूपर-पुणे १६ तासांचा प्रवास साडेसहा तासांत होईल. असा २४ जिल्ह्य़ांतून जाणारा मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, कोकण रस्ता देशातील महत्त्वपूर्ण रस्ता ठरणार आहे. ठाणे ते बोरिवली दोन तासांचा प्रवास १० मिनिटांत झाला पाहिजे म्हणून या प्रवासासाठी भुयारी मार्गाचा विचार सुरू आहे, असे शिंदे यांनी सांगितले. डोंबिवली-तळोजा मेट्रो मार्ग खोणी मार्गे न नेता शिळफाटा मार्गे नेण्यात यावा. कल्याणची मेट्रो खडकपाडापर्यंत विस्तारित केल्याने उल्हासनगर भागातील लोकांना लाभ मिळणार आहे, हे मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून त्याप्रमाणे प्रकल्प अहवाल तयार करण्यास सांगितले आहे, असे ते म्हणाले. मेट्रो मार्ग शिळफाटा येथून नेण्याची विनंती मुख्यमंत्र्यांना केली असल्याचे राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी सांगितले.
सहा पदरी मार्ग २०२१ पर्यंत पूर्ण
भिवंडी-शिळफाटा २१ किमीचा सहा पदरी मार्ग ३० महिन्यांत म्हणजे फेब्रुवारी २०२१ पर्यंत पूर्ण होईल. मेट्रो, प्रस्तावित शिळफाटा उन्नत मार्गामुळे या रस्त्याची संगत जुळवणे अवघड झाल्याने उन्नत मार्गाऐवजी सोयीच्या ठिकाणी उड्डाण पूल, काही ठिकाणी सहा पदरी मार्ग प्रस्तावित करण्यात आला. ऑगस्ट २०१८ मध्ये कामाचे कंत्राट अजय पाल कंपनीला देण्यात आले आहे. मेट्रो मार्ग उभारणीनंतर उन्नत मार्गाचा विचार केला जाईल, असे ‘एमएसआरडीसी’चे उपाध्यक्ष राधेश्याम मोपलवार यांनी सांगितले.