अंबरनाथ तालुक्यातील मलंग गडावर ये-जा करणारे भाविक तसेच स्थानिक रहिवाशांच्या सोयीसाठी हाती घेण्यात आलेल्या फ्युनिक्युलरचे (डोंगरावरील रेल्वे) काम डिसेंबपर्यंत पूर्ण करण्याचे आदेश पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी अलीकडेच आयोजित बैठकीत दिले.
या प्रकल्पाचे काम मुदतीत पूर्ण न झाल्यास संबंधित कंत्राटदारास काळ्या यादीत टाकण्याचे आदेशही त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले.
फ्युनिक्युलरचे काम संथगतीने सुरू असल्याबाबत खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी यापूर्वी संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेतली होती. तसेच पालकमंत्र्यांकडे याविषयी तक्रारही केली होती. त्याची दखल घेऊन एकनाथ शिंदे यांनी मंत्रालयात बैठक घेतली. या बैठकीला खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी तसेच फ्युनिक्युलरचे काम करणाऱ्या ‘सुप्रीम इन्फ्रास्ट्रक्चर’ आणि ‘याशिता’ या दोन कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
विद्यमान आराखडय़ात फ्युनिक्युलर रेल्वेला पायथा आणि माथा असे दोनच थांबे आहेत. त्याऐवजी मध्ये आणखी एखादा थांबा करावा, अशी सूचनाही पालकमंत्र्यांनी दिली.  
असा आहे प्रकल्प
फ्युनिक्युलर प्रकल्पामुळे मलंग गडावर ये-जा करणाऱ्या भाविकांची सोय होणार आहे. कारण सध्या गडावर चढून जाण्यास दीड ते दोन तास लागतात. या रेल्वेमुळे हे अंतर अवघ्या दहा मिनिटांत पार करता येईल. ‘बांधा-वापरा आणि हस्तांतरित’ (बीओटी) करा या तत्त्वावर हे काम देण्यात आले आहे. संबंधित कंत्राटदार तीस वर्षे हा प्रकल्प चालविणार आहे. पावसाळ्यातही ही रेल्वे डोंगरमाथा चढून जाणार आहे.

Story img Loader