ठाणे जिल्ह्यातील रस्ते दुरुस्ती आणि नुतनीकरणाची कामे १ जूनपूर्वी पूर्ण करून जिल्हा खड्डे आणि वाहतूक कोंडी मुक्त करण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अधिकाऱ्यांना शनिवारच्या बैठकीत दिले. रस्त्यावर खड्डे राहणार नाहीत, याची जबाबदारी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांची असेल. त्यात हलगर्जीपणा किंवा दुर्लक्ष केल्याचे निदर्शनास आल्यास संबंधित अधिकारी आणि कंत्राटदारांवर तात्काळ कठोर कारवाई करण्यात येईल असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ठाणे जिल्ह्यातील मुंब्रा बाह्यवळण मार्ग, मुंबई नाशिक महामार्गावरील साकेत खाडी पूल आणि खारेगाव खाडी पूलाच्या दुरुस्तीचे काम सार्वजनिक बांधकाम विभाग तसेच राज्य रस्ते विकास महामंडळाकडून सुरू आहे. एकाचवेळी सुरु असलेल्या कामांचा फटका वाहतूक व्यवस्थेला बसत आहे. दररोज दिवस-रात्र ठाणे, नवी मुंबई आणि भिवंडी शहरात वाहतूक कोंडी होत आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शनिवारी त्यांच्या ठाणे येथील निवासस्थानी अधिकाऱ्यांची तातडीची बैठक घेतली. या बैठकीस ठाणे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, पोलीस आयुक्त जयजित सिंग, ठाणे महापालिकेचे आयुक्त अभिजित बांगर, रस्ते विकास महामंडळाचे सहव्यवस्थापकीय संचालक अनिलकुमार गायकवाड, अतिरिक्त पोलीस आयुक्त दत्तात्रय कराळे यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते.

मुंबई महानगर क्षेत्रात सध्या अनेक ठिकाणी विकासकामे सुरू असून त्यामुळे ठाणे जिल्ह्यात वाहतूक कोंडी होत आहे. त्यामुळे संबंधित यंत्रणांनी १ जूनपूर्वी रस्ते दुरुस्ती आणि नुतनीकरणाची कामे पूर्ण करावीत, असे निर्देश मुख्यमंत्री शिंदे यांनी बैठकीत दिले. रस्ता कुणाच्या मालकीचा आहे, याचा विचार न करता त्यावरील खड्डे तात्काळ बुजवा, असेही त्यांनी सांगितले. पावसाळ्यात रस्त्यावर पडणारा लहान खड्डा देखील जीवघेणा ठरतो. त्यामुळे रस्त्यावर खड्डे दिसणार नाहीत याची जबाबदारी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांची असेल. यात हलगर्जीपणा किंवा दुर्लक्ष केल्याचे निदर्शनास आल्यास संबंधित अधिकारी आणि कंत्राटदार यांच्यावर तात्काळ कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला. साकेत-खारेगाव पुलावरील दुरुस्ती कामे दिवसरात्र अतिरिक्त मनुष्यबळ वापरून पुर्ण करुन घ्यावीत. मुंब्रा बाह्यवळण रस्त्याच्या कामाला गती देताना त्याच्या दुभाजकादरम्यान वृक्ष लागवडीचे तसेच त्यांच्या दोन्ही बाजू आधुनिक पद्धतीने बांबूच्या साहाय्याने सुशोभित करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.

हेही वाचा >>>कल्याणमध्ये मालकाने वेतन थकविल्यामुळे चिंताग्रस्त कामगाराची आत्महत्या

रस्ते कामे सुरु असल्याने वाहतूक कोंडी होत आहे. ही कोंडी कमी करण्यासाठी ठाणे महापालिका आणि सार्वजनिक बांधकाम विभागाने वाहतूक पोलिसांना अतिरिक्त वाहतूक सेवक उपलब्ध करून द्यावेत तसेच मुंबईतून अतिरिक्त पोलीस कुमक मागवून घ्यावी असे निर्देशही शिंदे यांनी दिले.

गेल्याकाही वर्षांपासून पूर्व द्रुतगती महामार्ग आणि घोडबंदर मार्गावरील सेवा रस्त्यावर बेकायदा वाहने उभी केली जात आहे. या वाहनांवर कारवाई करावी. तसेच बसगाड्या, ट्रक आणि शाळेच्या बसगाड्या उभ्या करण्यासाठी खारेगाव टोलनाका तसेच पूर्व द्रुतगती महामार्गालगतच्या जकात नाक्यांच्या मोकळ्या जागांचा वापर करावा, अशा सुचनाही शिंदे यांनी केली.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Eknath shinde order to officials regarding thane district potholes and traffic congestion amy
Show comments