उल्हासनगर: दिल्लीत साहित्य संमेलन सुरू नसून राजकीय दलाली सुरू आहे. कोणालाही कसेही पुरस्कार देतात. कोणाला कसेही सत्कार करतात, असा आरोप शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत यांनी केला होता. एकनाथ शिंदे यांना दिलेल्या पुरस्कारावरून राऊत यांनी ही टीका केली होती. या टीकेला उत्तर देताना एकनाथ शिंदे यांनी हा महादजी शिंदे यांचा अपमान असल्याची भावना व्यक्त केली आहे. तसेच हा साहित्यिकांचाही अपमान आहे. महापराक्रमी महादजी शिंदे राष्ट्र गौरव पुरस्कार मला मिळाला हे माझे भाग्य आहे. मात्र द्वेषाने पछाडलेले विरोधक टीका करताना काय बोलतात हेही त्यांना कळत नाही, अशीही टीका शिंदे यांनी यावेळी केली.
मंगळवारी दिल्लीत महादजी शिंदे राष्ट्र गौरव पुरस्कार देऊन महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना गौरविण्यात आले. माजी कृषिमंत्री आणि महाविकास आघाडीचे प्रमुख नेते असलेले शरद पवार यांच्या हस्ते शिंदे यांना हा पुरस्कार देण्यात आला. या पुरस्कार सोहळ्यानंतर महाविकास आघाडीतून शिवसेना ठाकरे गटाचे प्रवक्ते संजय राऊत यांनी उद्विग्न प्रतिक्रिया व्यक्त केली. दिल्लीत साहित्य संमेलन सुरू नसून राजकीय दलाली सुरू आहे. कोणालाही कसेही पुरस्कार देतात. या लोकांचा साहित्याशी संबंध काय. माझा आयोगाला प्रश्न आहे की तुम्ही दिल्लीत दलाली करायला गेलात का, असे राऊत म्हणाले होते. महाराष्ट्राच्या मानेवर पाय ठेवणाऱ्यांचा सत्कार करता तुम्ही, असा थेट प्रश्न राऊत यांनी पवार यांना उद्देशून उपस्थित केला. हे साहित्य संमेलन नसून दिल्लीतील दलाली आहे, असे संजय राऊत म्हणाले होते.
मलंगगडावर माघी पौर्णिमेनिमित्त आरती करण्यासाठी आलेल्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माध्यमांशी बोलताना राऊत यांच्या वक्तव्याचा खरपूस समाचार घेतला. महापराक्रमी महादजी शिंदे राष्ट्र गौरव पुरस्कार मला मिळाला हे माझे भाग्य आहे. मात्र द्वेषाने पछाडलेले विरोधक टीका करताना काय बोलतात हेही त्यांना कळत नाही. त्यांनी फक्त महादजी शिंदे यांचा अपमान केला नाही तर साहित्यिकांनाही दलाल म्हटले आहे, असे शिंदे म्हणाले. यांना यापूर्वी विधानसभा निवडणुकीत चारी मुंड्या चीत केले आहे. येत्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतही जनता यांना धडा शिकवला असे शिंदे म्हणाले.
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार धर्मवीर आनंद दिघे साहेब यांनी सुरू केलेली मलंग गड यात्रा आजही उत्साहात, जल्लोषात सुरू आहे. लाखो भक्तांचं नातं मच्छिंद्रनाथ यांच्या समाधीशी जुळलेले आहे. म्हणून दरवर्षी माघी पौर्णिमेला लाखो भक्त मलंगगडावर दर्शनासाठी येतात. मी या सर्व भक्तांचे स्वागत करतो, असेही शिंदे यावेळी म्हणाले.