डोंबिवली पश्चिमेतील कोपर भागात भाजपच्या कार्यकर्त्यांनी खासगी, सार्वजनिक, संरक्षित भिंतीवर येत्या लोकसभा निवडणुकीचा भाग म्हणून पक्षाचे बोध चिन्ह कमळ काढले होते. अशा प्रकारच्या ४५० चिन्हांवर शुक्रवारी मध्यरात्री कोपर भागातील दोन शिवसैनिकांनी डांबराने काळे फासल्याने या दोन पक्षातील स्थानिक पातळीवरील वितुष्ट पुन्हा एकदा दिसून आले अहो. दरम्यान या प्रकरणी भाजप डोंबिवली पश्चिम मंडळ अध्यक्ष समीर चिटणीस यांनी विष्णुनगर पोलीस ठाण्यात शनिवारी तक्रार केली.
हेही वाचा >>> ठाणे वाहतूक कोंडीमुक्तीसाठी साडेसहा हजार कोटींचे तीन प्रकल्प; निविदा प्रसिद्ध; ‘एमएमआरडीए’कडून सल्लागार नियुक्ती
विष्णुनगर पोलिसांनी पश्चिम मंडळ अध्यक्ष चिटणीस यांच्या तक्रारीवरून कोपर भागातील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षातील शिवसैनिक सम्राट अनंत मगरे, विशाल कोकाटे यांच्या विरूध्द गुन्हा दाखल केला आहे. भाजप केंद्र सरकारच्या कार्यक्रमाप्रमाणे डोंबिवलीतील भाजप पदाधिकाऱ्यांनी डोंबिवलीत ‘पुन्हा एकदा मोदी सरकार’ आणि त्याच्या बाजुला भाजपचे कमळ चिन्ह सार्वजनिक, खासगी ठिकाणच्या भिंती, संरक्षक भिंतीवर काढून भाजपची प्रचार मोहीम सुरू केली आहे. डोंबिवली पश्चिमेत कोपर भागात भाजप डोंबिवली पश्चिम मंडळ अध्यक्ष समीर चिटणीस, कोपर प्रभाग अध्यक्ष ऋषभ ठाकर यांच्या मार्गदर्शनाखाली भाजप कार्यकर्त्यांनी गेल्या आठवडाभर ४५० ठिकाणी पुन्हा एकदा मोदी सरकार आणि त्याच्या बाजुला कमळ चिन्ह रंगाने रेखाटून प्रचार मोहीम सुरू केली आहे.
हेही वाचा >>> ठाण्यातून लोकसभेसाठी गणेश नाईक? मुख्यमंत्री शिंदेंचे समर्थक अस्वस्थ
शनिवारी सकाळी कोपर अध्यक्ष ठाकर यांना कोपर भागातील भाजप कार्यकर्त्यांनी काढलेल्या सर्वच कमळ चिन्हांवर काळे फासले असल्याचे दिसले. यासंबंधीची माहिती घेतली असता त्यांना शिवसैनिक सम्राट मगरे, विशाल कोकाटे यांनी हा प्रकार केला असल्याचे समजले. त्यांनी ही माहिती चिटणीस यांना दिली. या दोन्ही शिवसैनिकांनी युतीत असलेल्या दोन पक्षांमध्ये तेढ निर्माण होईल, समाजातील एकोप्याला घातक, कार्यकर्त्यांमध्ये वैरभाव, व्देषभाव निर्माण होईल, अशी कृती केल्याने मंडल अध्यक्ष चिटणीस यांनी यासंदर्भात विष्णुनगर पोलीस ठाण्यात दोन्ही शिवसैनिकां विरूध्द तक्रार केली. तसेच, या प्रकरणाचा मागचा मुख्य सूत्रधार कोण, याचा शोध घेण्याची मागणी पोलिसांकडे केली आहे.
सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांकडे धाव
या प्रकाराचे तीव्र पडसाद भाजपच्या स्थानिक पातळीवर उमटू लागले आहेत. या प्रकरणी भाजपच्या स्थानिक कार्यकर्त्यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांची भेटू घेतली. तसेच त्यांच्या कानावर हा प्रकार घातला. कोपर भागात अनेक वर्षांपासून शिवसेनेची मोठी ताकद राहीली आहे. या भागात भाजपचे अभियान पाहून शिवसैनिकांमध्ये अस्वस्थता होती. त्यातून हा प्रकार घडल्याची माहिती स्थानिक सुत्रांनी दिली.
वाद नित्याचा
कल्याण लोकसभा मतदारसंघात भाजप आणि शिवसेनेतील वाद आता नित्याचा ठरु लागला आहे. डोंबिवलीतील पक्षाच्या प्रमुखावर विनयभंगाचा गुन्हा दाखल झाल्याने या दोन पक्षातील वाद शिगेला पोहचला होता. सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांनी जाहीरपणे स्थानिक खासदार डाॅ.श्रीकांत शिंदे यांच्याविरोधात भूमीका घेतली होती. यानंतर कल्याण पुर्वेचे भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी शिंदे समर्थक महेश गायकवाड यांच्यावर पोलीस ठाण्यात गोळीबार केल्याचा प्रकारामुळे राज्यभरात खळबळ उडाली होती. या मतदारसंघातील दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये अनेक ठिकाणी तीव्र मतभेद आहेत. असे असताना कोपरमधील प्रकारामुळे ही दरी वाढण्याची शक्यता आहे.
कोपर भागात घडलेल्या प्रकाराविषयी भाजप वरिष्ठांच्या आदेशावरून शिवसैनिकांविरूध्द पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. पोलिसांनी आरोपींना अटक करून यामागचा खरा सूत्रधार शोधावा अशी मागणी केली आहे.
समीर चिटणीस – अध्यक्ष, भाजप डोंबिवली पश्चिम मंडल अध्यक्ष.