ठाणे : दिल्लीकरांवर आपचे आलेले संकट १० वर्षानंतर दूर झाले आहे. या निवडणूकीतही संविधान, लोकशाहीची हत्या, मतदान यंत्रणांवर आरोप झाले. हा अपप्रचार पसरविणारे आम आदमी पक्ष, काँग्रेस यांना जनतेने चारीमुंड्या चीत करत भाजपला विजय केले. खोटेपणाचा पराभव आणि खरेपणाला लोकांनी स्विकारले आहे असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. तसेच शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हावर १५ उमेदवार निवडणूक लढविण्यास इच्छूक होते. परंतु मतविभाजन होऊ नये म्हणून शिवसेनेने दिल्लीत भाजपला पाठिंबा दिल्याचेही ते म्हणाले.

दिल्ली विधानसभा निवडणूक निकालाबाबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. पंतप्रधान नरेंद्र मोदी बोलतात ते करून दाखवितात. त्यामुळे त्यांच्या गॅरंटीवर दिल्लीकरांनी विश्वास दाखविला. इंडिया आघाडीने केलेल्या घोषणा अयशस्वी ठरल्या. काँग्रेसची प्रगती शून्याकडून शून्याकडे अशी सुरू आहे अशी टिका एकनाथ शिंदे यांनी काँग्रेसवर केली. तसेच दिल्लीमध्ये आम आदमी पक्षाने उमेदवारी नाकारलेल्या १५ उमेदवारांना धनुष्यबाण चिन्हावर निवडणूक लढवायची होती. परंतु शिवसेना आणि भाजप एकाच विचारधारेचे असल्याने मतविभाजन होऊ नये म्हणून शिवसेनेने एकही उमेदवार उभा केला नाही.

शिवसेनेने भाजपला पाठिंबा दिल्याचे शिंदे यांनी सांगितले. केजरीवाल यांनी सुरुवातील अण्णा हजारे यांच्यासोबत भ्रष्टाचारा विरोधात लढाई केली. पारदर्शकता आणि भ्रष्टाचारा विरोधातील भूमिका घेऊन केजरीवाल निघाले होते. केजरीवाल यांना मुख्यमंत्री करण्यामध्ये अण्णा हजारे यांचा मोठा वाटा होता. त्यांच्या आंदोलनातूनच केजरीवालांचा जन्म झाला. मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी अण्णा हजारे यांची साथ सोडली. भ्रष्टाचाराला जवळ केले. भ्रष्टाचाराविरोधात त्यांची यात्रा सुरू झाली होती. परंतु स्वत:च भ्रष्टचाराच्या दलदलीत अडकल्याने ही यात्रा संपली. केजरीवाल यांचा खरा चेहरा दिल्लीकरांनी ओळखला आहे असा आरोपही शिंदे यांनी केला.आम्ही कोणाला फोडायला जात नाही. त्यांनी त्यांची माणसे सांभाळावी. माणसे का सोडून जात आहेत, याचे आत्मपरिक्षण त्यांनी करावे असा टोला शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता लगावला.

Story img Loader