डोंबिवली – छत्रपती शिवाजी महाराजांनी उभारलेल्या रयतेच्या राज्याला डंख लावण्याचा प्रयत्न करणारा. संभाजी महाराजांना अतिशय क्रूरतेने मारणारा औरंगजेब हा क्रूर होता. अशा औरंगजेबाचे कोणी गोडवे गात असतील, त्यांचे समर्थन करत असतील तर त्यांना आम्ही निलंबनाच्या माध्यमातून बाहेरचा रस्ता दाखवलाच. त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला. त्यामुळे औरंगजेबाचे गोडवे गाणारे, त्याचे समर्थन करणारे हे देशद्रोहीच आहेत, असा घणाघात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवारी रात्री येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील (डाॅ. घारडा सर्कल) अश्वारूढ पुतळ्याचे लोकार्पण करताना केला.

खासदार डाॅक्टर श्रीकांत शिंदे यांच्या प्रयत्नातून डोंबिवलीत एमआयडीसीत घारडा सर्कल येथे कल्याण डोंबिवली पालिकेच्या पुढाकाराने शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभारण्यात आला. या चौकाचे नामकरण कल्याण डोंबिवली पालिकेने छत्रपती शिवाजी महाराज चौक करण्याचा निर्णय घेतला. या कार्यक्रमाला माजी मंत्री जगन्नाथ पाटील, खासदार डाॅक्टर श्रीकांत शिंदे, आयुक्त डाॅ. इंदुराणी जाखड, हिंदूराष्ट्र सेनाप्रमुख धनंजयभाई देसाई, कीर्तनकार संग्रामबापू भंडारे, आमदार राजेश मोरे, भाजप प्रदेश नेते शशिकांत कांबळे उपस्थित होते.

शिवाजी महाराजांच्या गौरवाचा इतिहास सांगताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रत्येकाने शिवाजी महाराजांचा एकतरी गुण घेतला पाहिजे. त्याप्रमाणे आचरण केले पाहिजे. ही महाराजांना खरी श्रध्दांजली ठरेल असे सांगितले. शिवाजी महाराज म्हणजे धैर्य, समर्पण, त्याग, निती, दूरदृष्टी, युगपुरूष, प्रवर्तक अशा अनेक सदगुणांचा एक तेजोगोल होता. या गुणांमुळे ते रयतेचा राजा म्हणून गौरवले गेले. डोंबिवलीच्या प्रवेशव्दारावरील हा पुतळा तरूण पिढ्यांना इतिहासाची आठवण करून देईल. त्यांना प्रेरणा देईल. शिवभक्तांना उर्जा देईल, असा विश्वास उपमुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.

आमचे सरकार हे शिवाजी महाराजांच्या विचारावर चालणारे सरकार आहे. विकासाला पुढे नेणारे, लोकाभिमुख योजना राबविणारे सरकार आहे, असे ते म्हणाले. खासदार डाॅ. शिंदे यांनी एक काव्य सादर करत शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची थोरवी गायली. या कार्यक्रमाला नागरिकांनी उत्स्फूर्त गर्दी केली होती. या अश्वारूढ पुतळ्याच्या उभारणीसाठी शहर अभियंता अनिता परदेशी, कार्यकारी अभियंता मनोज सांगळे यांनी विशेष मेहनत घेतली. मूर्तिकार मे. हेरिटेज इंडियाचे आतिश मालवणकर, अश्विन मालवणकर यांनी हा पुतळा साकरला आहे.

वेळेच्या बंधनाचे उल्लंघन

सार्वजनिक ठिकाणचा कार्यक्रम रात्री दहा वाजल्यानंतर सुरू राहिला तर पोलीस त्या कार्यक्रमाच्या आयोजकावर गुन्हा दाखल करतात. पुतळा लोकार्पणाचा कार्यक्रम रात्री साडे दहा वाजेपर्यंत सुरू होता. या कार्यक्रमाची आयोजक कल्याण डोंबिवली पालिका होती. त्यामुळे आता पोलीक काय भूमिका घेतात याकडे जाणत्यांचे लक्ष लागले आहे.