राज्यातील सत्तांतर नाट्यामधील पडद्यामागील एक महत्वाचा खेळाडू म्हणून ओळखले जाणारे डोंबिवलीतील भाजपचे आ. रवींद्र चव्हाण यांचे गुरुवारी डोंबिवलीत आगमन झाले. गेल्या वीस दिवसानंतर आ. चव्हाण यांचे डोंबिवलीत आगमन झाल्याने भाजप कार्यकर्त्यांनी जल्लोषात स्वागत केले. यावेळी चव्हाण यांनी राज्यामध्ये शिंदे गट आणि भाजपाला पुन्हा सत्ता मिळवून देताना योगदान देता आल्याबद्दल समाधान व्यक्त करतानाच महाराष्ट्रामधून बंडखोर आमदारांना गुजरातमध्ये कसं नेलं याबद्दलचीही माहिती दिली. २१ जूनच्या पहाटे शिंदेंसहीत काही शिवसेनेचे आमदार बंडखोरी करुन सुरतला निघून गेल्याची माहिती पहिल्यांदा समोर आली होती.
नक्की वाचा >> “आदित्य ठाकरेंना सुरतला पाठवतो असं मुख्यमंत्री म्हणाले, त्यावेळी…”; संजय राऊतांसंदर्भात आमदाराचा खळबळजनक दावा
राज्यातील सत्ता स्थापनेतील एक लहान जबाबदारी आपल्यावर होती
डोंबिवली पूर्वेतील सावकर रस्त्यावरील चव्हाण यांच्या जाणता राजा कार्यालयात मार्गदर्शन करताना ते म्हणाले, पक्षाने जबाबदारी दिल्यानंतर ती तन, मन आणि धनाने पूर्ण करणे हेच कार्यकर्ता म्हणून कर्तव्य पार पाडले. राज्यातील सत्ता स्थापनेतील एक लहान जबाबदारी आपल्यावर होती. ही जबाबदारी अतिशय कौशल्यपणे पार पाडली. त्यामुळे या सत्ता नाट्याने आणि पार पाडलेल्या जबाबदारीने मला थोड मोठं केलं असे मी म्हणेन, असं चव्हाण म्हणाले.
नक्की वाचा >> १३ हजार ३४० कोटींचा ‘तो’ निधी रोखला; अजित पवारांना शिंदे सरकारचा दणका
कार्यकर्त्यांनी समर्पित भावनेने काम करावे
संयम हीच भाजप कार्यकर्त्याची खरी ताकद आहे. सत्ता आली म्हणून वाहवत न जाता जबाबदारीचे भान ठेऊन प्रत्येकाने आपले कर्तव्य पार पाडावे, असा सल्ला आ. चव्हाण यांनी कार्यकर्त्यांना दिला. येत्या दोन वर्षात आपणास पुन्हा नरेंद्र मोदी यांना सत्तास्थानी विराजमान करायचे आहे. हे ध्येय ठेऊन भाजप कार्यकर्त्यांनी समर्पित भावनेने काम करावे, असे आवाहन आमदारांनी केले.
नक्की पाहा >> Photos: “घराची पायरी चढताच माझी…” CM होऊन घरी परतल्यानंतर शिंदेंची भावनिक पोस्ट; म्हणाले, “त्याने मला पाहिल्यावर…”
बंडखोरांना गुजरातला कसं घेऊन गेले
विधान परिषद निवडणुकीसाठी मतदान सुरू असताना दुपारच्या वेळेत बंडखोर आमदारांना राज्याबाहेर सुखरूप बाहेर काढण्याची जबाबदारी चव्हाण यांच्यावर होती. यासाठी लागणारी १५ ते २० खासगी वाहने चव्हाण यांनी डोंबिवलीतून उपलब्ध करून दिली होती. स्वतंत्रपणे प्रत्येक वाहन चालकांना फक्त सुरतला अमूक कामासाठी येण्याचे कळविण्यात आले होते. महाराष्ट्र हद्द ओलांडून डोंबिवलीतील कामगिरीवरील वाहने गुजरात हद्दीत जाताच त्यांना अचानक गुजरात पोलिसांचे संरक्षण मिळाले. आपल्या वाहनांचा पोलीस का पाठलाग करत आहेत यामुळे वाहन चालक सुरुवातीला घाबरले. पण, नंतर चव्हाण यांच्या बरोबरच्या संपर्कानंतर मोहिमेवरील वाहन चालकांनी सुटकेचा निश्वास सोडला.
फडणवीसांचं कौतुक
माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या वर्तणुकीतून पद महत्वाचे नसून पक्षासाठी त्याग, समर्पण महत्वाचे आहे. हा संदेश दिला आहे. याच पावलावर पाऊल ठेवत आपण पक्षाचा एक सामान्य कार्यकर्ता म्हणून वाटचाल करणार आहोत. समाज जीवनात हे काम करताना असताना हिंदुत्व आणि विकास कसा पुढे जाईल याला आपले प्रथम प्राधान्य असणार आहे, असे आ. चव्हाण यांनी सांगितले.