ठाणे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रकृती अद्यापही बरी झालेली नसून यामुळे सोमवारपाठोपाठ मंगळवारीही बैठका रद्द करत त्यांनी ठाण्यातील निवासस्थानीच विश्रांती घेतली. मंगळवारी दुपारी ते ज्युपिटर रुग्णालयात वैद्यकीय तपासणीसाठी गेले होते.
एकीकडे राज्यातील सरकार स्थापनेवरून वेगवेगळ्या चर्चा रंगल्या असतानाच, दुसरीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रकृती बिघडली आहे. विधानसभा निवडणुकीत झालेल्या धावपळीमुळे आराम करण्यासाठी मुख्यमंत्री शिंदे हे साताऱ्यातील दरे गावी गेले होते. तिथे त्यांची प्रकृती बिघडली होती. येथे त्यांनी शनिवारी विश्रांती घेतली आणि दुसऱ्या दिवशी म्हणजेच रविवारी ते ठाण्यातील शुभदीप निवासस्थानी परतले. सोमवारी ते पुन्हा पक्ष आणि महायुतीच्या बैठकांमध्ये सक्रीय होतील, अशी शक्यता वर्तवली जात होती. परंतु सोमवारीही त्यांची प्रकृती ठीक नव्हती. यामुळे त्यांनी दिवसभरातील बैठका रद्द करून घरीच विश्रांती घेतली.
हेही वाचा – क्रिप्टो चलनाच्या नावाने २६ लाख रुपयांची फसवणूक
हेही वाचा – ठाणे : टेस्ट ड्राईव्ह घेण्याच्या बहाण्याने दुचाकी चोरी
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ताप आणि घशाला संसर्ग झाला आहे. त्यांना सोमवारी घरीच सलाईन लावण्यात आली होती. भाजप नेते गिरीश महाजन यांनी शिंदे यांची भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली होती. दरम्यान, मुख्यमंत्री शिंदे यांची प्रकृती पूर्णपणे बरी झालेली नाही. यामुळे सोमवारपाठोपाठ मंगळवारीही मुख्यमंत्री ठाण्यातील निवासस्थानीच विश्रांती घेत आहेत. मंगळवारी दुपारी ते ज्युपिटर रुग्णालयात वैद्यकीय तपासणीसाठी गेले होते. प्रकृती ठीक नसल्यामुळे त्यांनी सर्वच बैठका रद्द केल्याचे समजते.