डोंबिवली: डोंबिवली येथील पूर्व भागातील उर्सेकरवाडी मधील एका हॉटेलच्या वृध्द मालकाला, या हॉटेलमधील वृध्द कामगार आणि सेवकाला तीन फेरीवाल्यांनी हॉटेलमध्ये घुसून बुधवारी संध्याकाळी बेदम मारहाण केली. मारहाण सुरू असताना बाजुचे दोन व्यापारी मध्यस्थी करण्यासाठी पुढे आले तर फेरीवाल्यांनी त्यांनाही मारहाण केली आहे. मारहाण सुरू असताना हॉटेल मालकाचा मुलगा चिंतन देढिया यांनी रामनगर पोलीस ठाण्यात संपर्क करुन तात्काळ पोलीस हॉटेलमध्ये पाठविण्यास सांगितले. हाकेच्या अंतरावर असलेल्या हॉटेलमध्ये पोलीस शेवटपर्यंत आले नाहीत, अशी तक्रार चिंतन देढीया यांनी केली आहे.
मिळालेली माहिती अशी, महेश देढिया (६३) यांचे डोंबिवली पूर्व रेल्वे स्थानक भागातील पूजा-मधुबन सिनेमा गृहांच्या बाजुला ड्रिम लॅन्ड हॉटेल आहे. हॉटेलमध्ये ग्राहक सेवक, स्वयंपाक गृहात ६० वर्षाची मावशी काम करतात. बुधवारी संध्याकाळी साडे चार वाजता उर्सेकरवाडी भागातील एक फेरीवाला ड्रिम लॅन्ड हॉटेलमध्ये जाऊन वडापावची मागणी करू लागला. वडापाव संपले आहेत. दुसरे जिन्नस तयार आहेत, असे सेवकाने फेरीवाल्याला सांगताच फेरीवाल्याने सेवकाशी हुज्जत घालून त्याला मारहाण सुरू केली. त्याच्या मदतीला इतर दोन फेरीवाले हॉटेलमध्ये आले.
ही मारहाण सोडविण्यासाठी हॉटेल मालक महेश देढिया, तेथील वृध्द मावशी मध्ये पडल्या तर रोहित अशोक गुप्ता (१९, रा. सुदाम वाडी, लक्ष्मण केणे इमारत, दत्तनगर, डोंबिवली पूर्व) आणि त्याच्या मुंब्रा येथील फेरीवाला असलेल्या दोन साथीदारांनी एकत्र येऊन हॉटेलमधील मालकासह कर्मचाऱ्यांना बेदम मारहाण सुरू केली. बाजुचे दोन व्यापारी मारहाण सोडविण्यासाठी मध्ये पडले तर त्यांनाही तीन फेरीवाल्यांनी बेदम मारहाण केली. तिन्ही फेरीवाले मधुबन सिनेमा रस्त्याने पळून गेले, असे चिंतन यांनी सांगितले.
ठोशाबुक्क्यांनी मारहाण झाल्याने वृध्द हॉटेल मालक महेश अस्वस्थ झाले. महेश यांचा मुलगा चिंतन हे तात्काळ रामनगर पोलीस ठाण्यात गेले. रामनगर पोलिसांनी प्राथमिक तपासणी गुन्हा दाखल करुन घेण्याऐवजी अदखलपात्र गुन्हा दाखल करुन घेतला. आणि तीन आरोपीऐवजी फक्त रोहित गुप्ता या एका आरोपीचा उल्लेख तक्रारीत नोंदवून घेतला. मुंब्रा येथील दोन फेरीवाल्यांचा उल्लेख पोलिसांनी तक्रारीत केला नाही.
दबावामुळे पोलिसांनी ही कृती केली नाही. याप्रकरणी आपण वरिष्ठांकडे तक्रार करणार आहोत, असे चिंतन देढिया यांनी सांगितले. परिसरातील सीसीटीव्ही चित्रिकरण पोलिसांना देऊन दोन फरार फेरीवाल्यांचा तपास करण्याची मागणी करणार आहोत, असे चिंतन देढिया यांनी सांगितले. सप्टेंबरमध्ये उर्सेकरवाडी भागात फेरीवाल्यांमध्ये हाणामारी झाली होती. अधिक माहितीसाठी रामनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक सचिन सांडभोर यांना दोन वेळा संपर्क केला. त्यांनी प्रतिसाद दिला नाही.