डोंबिवली : डोंबिवली पूर्वेत रेल्वे स्थानकाजवळील केळकर रस्त्यावर शुक्रवारी सकाळी एक वृध्द महिला रस्ता ओलांडत होती. त्यावेळी डोंबिवली एमआयडीसीतील एका प्रसिध्द शाळेची शाळकरी मुलांना घेऊन जाणारी बस तेथून जात होती. या बसच्या मागच्या चाकाखाली येऊन रस्ता ओलांडत असणारी महिला येऊन या महिलेचा जागीच मृत्यू झाला.या महिलेला पादचाऱ्यांनी तात्काळ रामनगरमधील एका खासगी रुग्णालयात नेण्यात आले. तेथे डाॅक्टरांनी तिला मृत घोषित केले. या अपघात प्रकरणी रामनगर पोलिसांनी शाळेच्या बस चालकाला ताब्यात घेतले आहे.

सुप्रिया मराठे (६८) असे मरण पावलेल्या महिलेचे नाव आहे. त्या आपल्या पती सोबत रामनगर भागातील उर्सेकरवाडी भागात राहत होत्या. शुक्रवारी सकाळी सुप्रिया मराठे बाजारात खरेदीसाठी बाहेर पडल्या होत्या. रिक्षा, खासगी वाहनांनी गजबजलेल्या केळकर रस्त्यावरून त्या जात होत्या. रस्ता ओलांडत असताना त्या एका शाळेच्या बसच्या मागच्या चाकाखाली आल्या. हा प्रकार घडत असताना बस चालकाने जागीच बस थांबवली. गंभीर जखमी झालेल्या महिलेला तात्काळ उर्सेकरवाडीतील एका खासगी रुग्णालयात नेण्यात आले. तेथे तिला डाॅक्टरांनी मृत घोषित केले. याप्रकरणात रामनगर पोलिसांनी बस चालकाला चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.

डोंबिवली पूर्वेतील रामनगर मधील केळकर रस्ता हा सर्वाधिक वर्दळीचा रस्ता आहे. या रस्त्यावर व्यापारी पेठ आहे. माणकोली उड्डाण पूल सुरू झाल्यानंतर या रस्त्यावरील वाहनांची संख्या वाढेल हा विचार करून तत्कालीन पालिका माजी आयुक्त ई. रवींद्रन यांनी केळकर रस्त्याच्या रुंदीकरणासाठी जोरदार तयारी केली होती. विकास आराखड्यातील रस्त्याला बाधित इमारत, व्यापारी गाळे मालकांना पालिकेने कारवाईसाठी नोटिसा पाठविल्या होत्या. अशाच पध्दतीने डोंबिवली पश्चिमेतील पंडित दिनदयाळ रस्त्याचे रुंदीकरण करण्यात येणार होते.

या रस्त्यांचे रुंदीकरण म्हणजे जुने रहिवासी, व्यापाऱ्यांवर अन्याय आहे. असे कारण पुढे करत राजकीय पुढाकाराने रहिवासी, व्यापाऱ्यांनी याप्रकरणी न्यायालयात धाव घेतली. पालिकेच्या कारवाईला स्थगिती आणली होती. त्यामुळे या महत्वपूर्ण रस्त्यांचे रुंदीकरण नंतर रखडले. माणकोली पूल सुरू झाल्यामुळे आता पंडित दिनदयाळ रस्ता, केळकर रस्त्यावरील वाहनांचा भार वाढला आहे. केळकर रस्त्यावरील अरूंद जागेत तीन रांगांमध्ये वाहनतळावर रिक्षा उभ्या असतात. या रस्त्याच्या एका मार्गिकेतून बस, खासगी वाहने येजा करतात. हा रस्ता रूंद झाला असता तर आता होणारी कोंडी, अपघात टळले असते अशी चर्चा आता नागरिक करत आहेत.