विधान परिषद निवडणूक आचारसंहितेच्या कचाटय़ात सापडलेल्या मीरा-भाईंदरच्या नालेसफाईच्या कामाला निवडणूक आयोगाकडून हिरवा कंदील दाखवला आहे. या कामासाठी काढण्यात आलेल्या निविदांना मंजुरी देण्यासाठी स्थायी समितीची विशेष सभा बोलाविण्यास आयोगाने गुरुवारी परवानगी दिली. त्यानंतर प्रशासनाने शुक्रवारी युद्धपातळीवर स्थायी समितीची बैठक बोलावून निविदांना मंजुरी घेतली असून कामाला सुरुवात केली आहे.
यंदा नालेसफाईच्या कामाला निधी कमी देण्यात आल्याने सुरुवातीला कोणताही कंत्राटदार काम करण्यासाठी पुढे येत नव्हता. त्यामुळे प्रशासनाला तीन वेळा निविदा काढाव्या लागल्या. यात बराचसा अवधी वाया गेला. तिसऱ्या वेळी एका कंत्राटदाराने निविदा भरली. मात्र त्याच वेळी विधान परिषद निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली. आचारसंहितेमुळे स्थायी समितीची सभा लावणे शक्य होत नसल्याने निविदांना मंजुरी मिळत नव्हती आणि त्यामुळे नालेसफाईचे काम सुरू होत नव्हते. यंदा पावसाचे आगमन लवकर होण्याचे अंदाज व्यक्त होत आहेत. या पाश्र्वभूमीवर नालेसफाईचे काम रखडत असल्याने प्रशासन अडचणीत सापडले होते. स्थायी समितीची सभा बोलाविण्यास परवानगी मिळावी यासाठी आयुक्तांनी निवडणूक आयोगाला साकडे घातले होते. मात्र आयोगाकडूनही परवानगी लवकर येत नसल्याने प्रशासनाची चांगलीच धावपळ उडाली. अखेर निवडणूक आयोगाची परवानगी मिळविण्यासाठी प्रशासनाने दिल्लीपर्यंत धाव घेतली, तेव्हा गुरुवारी सायंकाळी ही परवानगी हाती पडली. शुक्रवारी सकाळी तातडीने स्थायी समितीची विशेष बैठक बोलावून त्यात नालेसफाईच्या निविदेला मंजुरी देण्यात आली. आशापुरा कन्स्ट्रक्शन या कंत्राटदाराला नालेसफाईचे काम देण्यात आले असून लगेचच कामाला सुरुवात करून पावसाळ्याअगोदर नालेसफाई पूर्ण करण्यात येईल, अशी माहिती उपायुक्त डॉ. संभाजी पानपट्टे यांनी दिली.