डोंबिवलीतील फडके रस्त्या वरील श्री गणेश मंदिर संस्थान शतकोत्तर महोत्सवाकडे वाटचाल करत आहे. त्यामुळे मंदिर संस्थानची विश्वस्त पदाची निवडणूक बिनविरोध व्हावी म्हणून संस्थानच्या पदाधिकाऱ्यांनी आटोकाट प्रयत्न केले. त्यात यश न आल्याने येत्या रविवारी संस्थानची विश्वस्त पदासाठी निवडणूक घेण्यात येणार आहे.
हेही वाचा- भाजपाकडून ‘नमो रमो नवरात्रोत्सव’चे आयोजन; गायिका अमृता फडणवीस यांच्या गाण्यावर थिरकले डोंबिवलीकर
शंभर वर्षाहून अधिक काळाचे ग्रामदैवत म्हणून ओळखले जाणारे श्री गणेश मंदिर डोंबिवली परिसरातील भाविकांचे श्रध्दास्थान आहे. मंदिर आता शताब्दी महोत्सवाकडे वाटचाल करत आहे. मंदिराचे आता ९८ वे वर्ष सुरू आहे. मंदिर हे केवळ देवस्थान म्हणून न ठेवता सामाजिक, वैद्यकीय, आरोग्य, स्वच्छता, शालेय, दुष्काळग्रस्त, पूरग्रस्तांना मदत असे अनेक उपक्रम संस्थानतर्फे दरवर्षी राबविण्यात येतात.
हेही वाचा- दसऱ्यानिमित्त प्रवाशांकडून डोंबिवली, कल्याण रेल्वे स्थानकात लोकल पूजन
गणेश मंदिर विश्वस्त पदावर ११ सदस्य आहेत. विश्वस्त पदासाठी बिनविरोध निवड व्हावी यासाठी पदाधिकाऱ्यांनी प्रयत्न केले. पण तीन अर्ज दाखल झाल्याने निवडणुकीशिवाय पर्याय राहिला नसल्याने विश्वस्त पदासाठी निवडणूक घेण्यात येणार आहे, असे एका सुत्राने सांगितले.
२०२७ पर्यंत पाच वर्षासाठी विश्वस्तांची मुदत असणार आहे. विश्वस्त पदावरील एक जागा महिलांसाठी राखीव आहे. या जागेवर गौरी खुंटे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. रविवारी सकाळी साडे आठ ते साडे बारा वेळेत विश्वस्त पदासाठी मतदान होईल. मतमोजणी तात्काळ करुन संध्याकाळी चार वाजता मतमोजणीचा निकाल जाहीर केला जाणार आहे.
हेही वाचा- उद्या दुपारपासून ठाण्यात अवजड वाहतूक बंद
विश्वस्तांमधील जुने जाणते डाॅ. अरुण नाटेकर, नीलेश सावंत, शिरिष आपटे यांच्या जागेवर कुळकर्णी ब्रदर्सचे श्रीपाद कुळकर्णी, डाॅ. उत्कर्ष भिंगारे, आनंद धोत्रे यांची वर्णी लावण्यात येणार असल्याचे समजते. तसेच विश्वस्त दिवंगत अच्युतराव कऱ्हाडकर यांच्या जागेवर वैद्य विनय वेलणकर यांना स्थान देण्यात येणार आहे. मंदिर स्थापनेच्या १९२४ पासून गणेश मंदिर संस्थान कार्यकारिणीचे एकूण सुमारे पाच हजार ६४ सभासद आहेत. गेल्या ९८ वर्षात यामधील अनेक मयत झाले, काही स्थलांतरित झाले आहेत. ही संख्या आता सुमारे तीन ते चार हजार दरम्यान असावी. प्रत्यक्ष मतदानाच्यावेळी सुमारे ८०० सभासद उपस्थित असतात, असे एका मंदिर पदाधिकाऱ्याने सांगितले.