ठाणे : ठाणे महापालिका क्षेत्रातील नगर पथ विक्रेता (फेरीवाला) समितीच्या सदस्य पदाची निवडणूक प्रशासकीय कारणास्तव स्थगित करण्यात आली असल्याचे प्रशासनाने काही दिवसांपुर्वी स्पष्ट केले असले तरी उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार पालिकेला फेरिवाल्यांच्या नवीन नोंदणीनंतरच निवडणुक घ्यावी लागणार आहे. यामुळे पालिकेकडून शहरातील फेरिवाल्यांच्या नोंदणीसाठी नव्याने पुन्हा सर्वेक्षण करण्यात येणार आहे. या सर्वेक्षणानंतरच फेरिवाला समिती सदस्य पदासाठी निवडणुक होणार असल्याची माहिती पालिका सुत्रांनी दिली.
ठाणे महापालिका पथ विक्रेता समितीमधील पथ विक्रेत्यांच्या प्रतिनिधींची नगर पथ विक्रेता समितीचे सदस्य म्हणून नोंदणीकृत पथ विक्रेत्यांमधून ५ वर्षांच्या कालावधीसाठी निवडणूक होणार असल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी प्रबोधन मवाडे यांनी काही दिवसांपुर्वी जाहीर केले आहे. यानुसार ठाणे महापालिका क्षेत्रातील नगर पथ विक्रेता (फेरीवाला) समितीवरील आठ प्रतिनिधींच्या निवडीसाठी निवडणुक कार्यक्रम जाहीर करण्यात आला होता. यासाठी पालिका प्रशासनाने २६ मार्च रोजी महापालिका मुख्यालय, प्रभाग समिती कार्यालय तसेच ठाणे महापालिकेच्या वेबसाईटवर प्रभाग समितीनिहाय अशी एकूण १३६५ मतदारांची यादी प्रसिद्ध केली होती. तसेच ११ एप्रिल रोजी मतदान आणि त्याचदिवशी मतमोजणी होईल, असेही प्रशासनाने जाहीर केले होते. मात्र, या निवडणुक प्रक्रियेस मनसेने विरोध केला होता. करोनानंतर उदरनिर्वाहासाठी व्यवसाय सुरू केलेल्या नव्या फेरीवाल्यांना या निवडणुकीत मतदानाचा अधिकार मिळणार नाही. त्यामुळे निवडणूक पुढे ढकलून प्रथम नवीन फेरीवाल्यांची नोंदणी करण्यात यावी, अशी मागणी मनविसेचे सरचिटणीस संदीप पाचंगे यांनी महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्याकडे निवेदनाद्वारे केली होती. या संदर्भात उच्च न्यायालयात याचिका दाखल झाली होती. दरम्यान, ही निवडणूक प्रशासकीय कारणास्तव स्थगित करण्यात आल्याचे प्रशासनाने जाहिर केले होते.
नगर पथ विक्रेता (फेरीवाला) समितीच्या सदस्य पदाची निवडणूकीसाठी ठाणे महापालिकेने एकूण १३६५ मतदारांची यादी प्रसिद्ध केली होती. या मतदारांची यादी २०१८ मध्ये अंतिम करण्यात आली होती. दरम्यान, उच्च न्यायालयात दाखल झालेल्या याचिकेवर सुनावणीदरम्यान, निवडणुकीसाठी मतदारांची तीन महिने आधीची यादी असावी, असे न्यायालयाने स्पष्ट केले होते. यामुळे पालिका प्रशासनाने आता न्यायालयाच्या आदेशानुसार नवीन नोंदणीसाठी पुन्हा सर्वेक्षण करण्याचा निर्णय घेतला असून यानंतर तयार होणाऱ्या अंतिम यादीद्वारे निवडणुक घेतली जाणार आहे. या संदर्भात पालिकेचे उपायुक्त शंकर पाटोळे यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी या वृत्तास दुजोरा दिला.
सर्वसाधारण गट (महिला राखीव) ३ जागा, अनुसूचित जाती (महिला राखीव) १ जागा, अनुसूचित जमाती १ जागा, इतर मागास वर्ग १ जागा, अल्पसंख्याक १ जागा, विकलांग व्यक्ती (महिला राखीव) १ जागा अशा एकूण आठ जणांची नगर पथ विक्रेता समितीच्या सदस्यस पदी निवडणुक होणार आहे. यात आठपैकी पाच जागा महिलांसाठी आरक्षित असणार आहेत. मात्र, ही निवडणुक आता लांबणीवर पडली आहे.