बदलापूरः गेल्या काही दिवसांपासून बदलापूर शहरात सातत्याने खंडीत होणाऱ्या वीज पुरवठ्यामुळे नागरिकांत संतापाचे वातावरण असतानाच आता उल्हासनगर आणि अंबरनाथ विभागातील रोहित्रांच्या क्षमतावाढीसाठी सुमारे ८ दिवसांचे कार्य हाती घेण्यात आले आहे. त्यामुळे बदलापुरातील नागरिकांच्या विजेची मागणी पुरवण्यासाठी भार व्यवस्थापन केले जात असून अनेक भागात वीज गायब होत असल्याने नागरिकांत संताप आहे. त्यातच सातत्याने खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्यामुळे उद्योगांच्या क्षमतेवर परिणाम होत असल्याची तक्रार बदलापुरातील उद्योजकांनी केली आहे. त्यामुळे नागरिकांसह उद्योजकही त्रासले आहेत. नागरिकांना अखंडित वीज देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील असल्याचे महावितरणाकडून सांगितले जाते आहे.

महापारेषण कंपनीतर्फे मंगळवापासून अंबरनाथच्या आनंदनंगर उपक्रेंदातील ५० मेगाव्हॅट ऍम्पीयर क्षमतेच्या रोहित्रांची क्षमता वाढ करून १०० मेगाव्हॅट ऍम्पीयर करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. यासाठी या उच्चदाब वाहिनीवरून केला जाणारा वीज पुरवठा साधारणतः ८ ते ९ दिवस बंद ठेवला जाणार आहे. मंगळवारपासून याच्या कामाला सुरूवात झाल्यानंतर आनंदनगर वाहिनीवरील भार मोरिवली वाहिनीवर स्थलांतरीत करण्यात आल्याची माहिती महावितरणाच्या बदलापूर विभागाचे कार्यकारी अभियंता आनंद काटकर यांनी दिली आहे. मात्र गेल्या तीन दिवसांपासून वाढलेला पारा आणि उष्णतेच्या लाटेचा दिलेला इशारा या पार्श्वभूमीवर बदलापूर पूर्वेतील रहिवाशी भागांना अखंडित विजपुरवठा करणे महावितरणाला अशक्य होऊ लागले आहे. त्यामुळे काही भागातील वीज पुरवठा बंद करून काही भागात वीज देण्याचे भार व्यवस्थापन केले जाते आहे. परिणामी ऐन वाढलेल्या उष्णतेत घामांचा धारात राहण्याची वेळ नागरिकांवर आली आहे. बदलापूर पूर्वेतील बहुतांश भागात सकाळी साडे नऊ वाजल्यापासून दोन वाजेपर्यंत वीजपुरवठा खंडीत करण्यात आला होता. तर सोमवारी सायंकाळीही कोणत्याही पूर्वसूचनेशिवाय वीजपुरवठा खंडीत करण्यात आल्याची माहिती स्थानिक रविंद्र रानडे यांनी दिली. पश्चिमेतही विजेचा लपंडाव सुरूच आहे. एकीकडे अखंडीत वीज पुरवठा करण्यात महावितरण अपयशी होत असताना ऐन उन्हाळ्यात सुरू केलेल्या या कामामुळे आता नागरिक संताप व्यक्त करत आहेत. आणखी किमान ९ दिवस नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागणार असल्याची माहिती आहे.

उद्योजकही संतप्तमहापारेषणच्या या कामामुळे उद्योजकांनी संताप व्यक्त केला आहे. आधीच सातत्याने वीज पुरवठा खंडीत होत असल्याने आम्हाला उत्पन्नावर पाणी सोडावे लागते आहे. अनियमित आणि खंडीत वीज पुरवठयामुळे उत्पादन कमी होते आणि परिणामी उद्योगांचे नुकसान होते आहे. सतत वीज पुरवठा खंडित होत असल्याने ग्रिडवर सौर उर्जा जनरेटरची सौर उर्जा निमिर्ती थांबते. याबाबत सातत्याने पाठपुरावा करूनही त्याच समस्यांना तोंड द्यावे लागते आहे. बदलापुरातील उद्योग वाचविण्याकरिता तातडीने काही तरी उपाययोजना कराव्यात अशी विनंती, बदलापूर इंडस्ट्रीयल वेल्फेअर असोसिएशनचे अध्यक्ष खुशाल जैन यांनी केली आहे.

सहकार्य करावे

सध्या सुरू असलेल्या कामामुळे क्षमतावाढ होऊन पुढच्या काही वर्षातील वीज पुरवठ्याला फायदा होईल. येत्या काळात उष्णता अधिक वाढण्याची शक्यता असल्याने मार्च महिन्यातच हे काम हाती घेतले आहे. रहिवाशी वीजपुरवठा खंडीत होऊ नये यासाठी आम्ही नियोजन केले आहे. मात्र मागणी वाढल्यास नियोजन बिघडू शकते. त्यामुळे भविष्यातील अखंडीत विजपुरवठ्यासाठी नागरिकांनी आज सहकार्य करावे. – प्रविण चकोले, कार्यकारी अभियंता, उल्हासनगर -२.

Story img Loader